कॉर्पोरेट क्षेत्रात शोभेल असे व्यक्तिमत्त्व लाभलेले दत्तात्रय पडसलगीकर हे मृदु स्वभावाचे भासत असले तरी कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात नागपुरात अवैध धंदेवाल्यांविरुद्ध सुरू केलेल्या मोहिमेने त्यांनी वेगळाच ठसा उमटविला होता. या कारवाईमुळे त्यांना बदलीची शिक्षा भोगावी लागली होती. अमरावती, कराड, नाशिक तसेच त्यानंतर काही काळ गुप्तचर विभागात आणि पुन्हा मुंबईत त्यांची नियुक्ती झाली होती. प्रत्येकवेळी सुस्वभावी पडसलगीकर यांनी करारी पद्धतीने आपली कार्यपद्धती राबविली. त्यांच्या नियुक्तीने धनंजय जाधव यांच्यानंतर मुंबईला दुसऱ्यांदा मराठी पोलीस आयुक्त लाभले आहेत.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदासाठी पडसलगीकर इच्छुक नाहीत, असेही एका गटाकडून पसरविले जात होते. परंतु त्याबाबत पडसलगीकर यांनी एक चकार शब्दही काढला नाही. गुप्तचर सेवेतून त्यांना पुन्हा महाराष्ट्र सेवेत पाठवावे, या राज्य शासनाच्या विनंतीला केंद्र शासनाने मान देऊन त्यांना परत पाठविले.