दिल्लीत आयबीचे सहसंचालक असलेल्या दत्तात्रय पडसलगीकर यांची मुंबईच्या आयुक्तपदी नियुक्ती झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या. दिल्लीच्या या अधिकाऱ्याला ‘मुंबई’सारख्या कॉस्मोपोलिटीन शहराची कायदा-सुव्यवस्था हाताळणे कितपत झेपेल, अशी कुजबूजही सुरू झाली. पण मुळात पडसलगीकर यांना ‘मुंबई दूर नाही’..नवीन तर नाहीच नाही. उलट त्यांची कारकिर्द बहरली ती मुंबईतच. ऐन दंगलीच्या काळात मुंबईत कायदा-सुव्यवस्थाच नव्हे तर विस्कटलेल्या, तुटलेल्या मनांना जोडण्याचे कामही पडसलगीकर यांनी केले. त्यातच त्यांच्या कामाची चुणूक दिसून येते.

‘दत्ता’ म्हणून सहकाऱ्यांमध्ये परिचित असलेले दत्तात्रय पडसलगीकर यांची पोलीस उपायुक्त म्हणून मुंबईच्या जे. जे. पायधुनी, डोंगरी विभागात नियुक्ती झाली तेव्हाच त्यांनी आपले वेगळेपण दाखवून दिली. त्यावेळचे हे परिमंडळ आकारानेही मोठे होते. ९२-९३ नंतरच्या दंगलीला दोन वर्षे उलटल्यानंतरही ‘त्यांचे’ आणि ‘आपले’ अशी भाषा सुरू होती. त्यामुळे ते अस्वस्थ होते.

स्वयंसेवी संघटनांच्या मदतीने पडसलगीकर यांनी ही दरी मिटवून टाकण्याचा प्रयत्न सुरू केला. सुरुवातीला पोलीस शिपायांना व्हॉलीबॉल खेळण्यास त्यांनी सांगितले.

हळूहळू त्यात तिथले तरुण सामील होऊ लागले. पडसलगीकरांना तेच हवे होते. मग तेथील पालिका शाळेतील तीन खोल्या ताब्यात घेऊन टेबल-टेनिस, वाचनालय तसेच दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सुरू झाले. मग ‘टाटा ट्रस्ट’च्या मदतीने तांत्रिक शिक्षण देण्यास सुरूवात केली. साबु सिद्दीकमधील तरुण-तरुणी त्यात सामील झाले. तेथेच नव्हे तर अन्यत्र अशा १६० तरुण-तरुणींच्या आयुष्याला वेगळे वळण मिळाले. इमामवाडा शांत झाला आणि त्यांचे-आपले ही भाषाही ते विसरून गेले. रिबेरो यांनी तर त्यावेळी पडसलगीकर यांचे जाहीर कौतुकही केले.

वडील सैन्यात असल्यामुळे सतत होत असलेल्या बदलीच्या ठिकाणांवर त्यांचे शिक्षण अवलंबून होते. दहा वर्षे ते पुण्यात होते. फग्र्युसन महाविद्यालय व नंतर पुणे विद्यापीठातून त्यांनी फ्रेंच साहित्यातील पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. त्यांना उर्दूही उत्तम येते. भारतीय पोलीस सेवेत दाखल झाल्यानंतर ‘लोकप्रशासन’ या विषयातील अभ्यासक्रमासाठी पॅरिसमध्ये ४५ देशांतून जमलेल्या पोलीस अधिकाऱ्यांमध्ये ते पहिले आले. आधुनिकीकरणाचा पोलीस दलाला होणारा लाभ हा त्यांचा आवडीचा विषय आहे. या विषयावर ते खूप आत्मीयतेने बोलतात.

कुठल्याही बाबीची प्रसिद्धी घ्यायची नाही, ही त्यांची पद्धत. कामाठीपुऱ्यात तब्बल ४५० मुलींची सुटका करून त्यापैकी अडीचशे मुलींना त्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविण्याची योजनाबद्ध कामगिरी पडसलगीकर यांच्या कारकिर्दीतीलच. परंतु त्याचाही त्यांनी कधीही ब्रभा केला नाही. या कामगिरीचे श्रेय त्यांनी पोलीस शिपायांना दिले.

गुन्हे अन्वेषण विभागात असताना अमर नाईकला चकमकीत टिपण्याची कामगिरी करणाऱ्या विजय साळसकर यांना संपूर्णपणे सहकार्य करताना त्यांनी या मोहिमेचे नेतृत्त्वही केले.

आर्थिक गुन्हे विभागात चर्मोद्योग घोटाळ्याच्या तपासात तत्कालीन उपायुक्त संजय पांडे यांच्यामुळे निर्माण झालेला वाद पडसलगीकर यांच्या नियुक्तीनंतर संपुष्टात आला. इतकेच नव्हे तर या घोटाळ्याचा तपास पूर्ण करून आरोपपत्र दाखल होण्याची काळजी त्यांनीच घेतली.

नागपूर, अमरावती, कराड, मुंबई आणि गुप्तचर विभागातील सर्वात मोठी कारकिर्द घडतानाही पडसलगीकर हे नाव नेहमीच चर्चेत राहिले. पोलीस शिपाई त्यांना देवमाणूसच संबोधतात. कुणाशीही ते त्याच आत्मीयतेने बोलतात तेव्हा त्यांच्यातील कमालीचा सुसंस्कृतपणा दिसून येतो.