पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी भारताला इशारा दिला. भारताने पाकिस्तानवर हल्ला केला तर आम्ही काही करणार नाही असे तुम्हाला वाटते का? आम्ही चोख प्रत्युत्तर देणार अशी धमकी इम्रान खान यांनी दिली. युद्ध सुरु करणं माणसांच्या हातात आहे पण ते कुठे जाऊन संपेल ते देवालाच माहित असे विधान इम्रान यांनी केले. इम्रान यांच्या युद्धाच्या धमकीवर निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. एबीपी माझा वृत्तवाहिनीशी ते बोलत होते.

भारताला आरोप करण्यासाठी वेड लागलेलं नाही. अतिरेक्यांना पाकिस्तानात प्रशिक्षण मिळतं. यापुढे आणखी काय पुरावे हवेत. हाफीज सईदच्या संभाषणाचे पुरावे आहेत. पाकिस्तानला सहानुभूती दाखवू नका. हा साप आहे कधी चावले याची खात्री देता येत नाही असे शेकटकर म्हणाले. पाकिस्तान सांगतो त्यांच्याकडे अणूबॉम्ब आहे. आम्ही त्याचा वापर करु अशी धमकी देतात. तुमच्याकडे अणूबॉम्ब आहे हे आम्हाला माहित आहे. त्याला घाबरण्याची आवश्यकता नाही. पाकिस्तानला आता धडा शिकवला नाही तर भारतीय जनता सरकारला कधीही माफ करणार नाही. धमकी दिली म्हणून कारवाई न करणे चुकीचे ठरेल असे शेकटकर म्हणाले.

काय म्हणाले इम्रान खान
पुलवामा दहशतवादी हल्ल्यासंबंधी कोणताही पुरावा नसताना भारताकडून पाकिस्तानवर आरोप केला जात असल्याचं सांगत पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी आरोप फेटाळून लावत हात झटकले आहेत. भारताने पुरावे दिले तर नक्की कारवाई करु असं आश्वासनही देत युद्ध छेडल्यास जशास तसं उत्तर देऊ अशी धमकी भारताला दिली.