परीक्षेत नापास झाल्यामुळे नाराज वडिलांनी चोप दिल्याचा राग मनात ठेवून अंधेरीहून ठाण्यात पळून आलेल्या एका १४ वर्षांच्या मुलीला येथील रिक्षाचालकाच्या दक्षतेमुळे पुन्हा तिच्या कुटुंबापर्यंत पोहोचविण्यात पोलिसांना यश आले आहे. या मुलीला घरी जायचेच नसल्यामुळे चक्क आपल्या अपहरणाचा बनाव रचला. मात्र चाइल्ड प्रोटेक्शन युनिटच्या पथकाने तिच्या पालकांचा शोध घेत तिला घरी सोडले.
साकीनाका परिसरातील एका सुखवस्तू व्यावसायिकाची इयत्ता नववीमध्ये शिकणारी ही मुलगी एका विषयात नापास झाली होती. शनिवारी तिने आपला निकाल वडिलांना सांगितला. तेव्हा संतापलेल्या वडिलांनी तिला चोप दिला. वडिलांच्या मारामुळे रागावलेल्या या मुलीने घरातून पळ काढला. शनिवारी ही मुलगी संपूर्ण दिवस ठाण्यात भटकत राहिली. रात्री दहाच्या सुमारास ती ठाणे स्थानकात पोहोचली व पुढे काय करायचे हे सुचत नसल्याने ती तेथेच फिरत राहिली. त्याच वेळी तेथे रिक्षा चालवणारे अपंग रिक्षाचालक सुरेश टावरे यांनी तिची विचारपूस केली. त्या वेळी पालकांपर्यंत पोहोचता येऊ नये म्हणून या मुलीने आपल्या अपहरणाची सुरस कहाणी टावरे यांना ऐकवली. मी मूळची अजमेरची असून आई-वडिलांचे अपघातात निधन झाल्याने शेजाऱ्यांनी कामधंद्यासाठी ठाण्यात आणले. मात्र ते मला इथेच सोडून गेल्याने मी एकटी पडली आहे, असा कांगावा तिने केला. मुलगी एकटी असल्याने टावरे यांनी या तिला कोपरी पोलीस स्थानकातील पोलिसांकडे सुपूर्द केले. तिथे बाल संरक्षण विभागाच्या पोलिसांनी मुलीची विचारपूस केली. तेव्हाही मुलीने हीच गोष्ट पोलिसांना ऐकवली. मात्र तिच्या बॅगेमधील पुस्तकांवर साकीनाका, अंधेरी शिक्का असल्याने पोलिसांनी साकीनाका पोलिसांकडे विचारणा केली. तेव्हा ही मुलगी हरवली असल्याची तक्रार त्यांच्याकडे दाखल झाल्याचे समजले. साकीनाका पोलिसांनी या मुलीच्या पालकांना ठाणे पोलिसांच्या बाल संरक्षण विभागाकडे पाठवले. त्यानंतर तिचा बनाव उघड झाला, अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांनी दिली.