मृत पोलीस अधिकाऱ्याच्या दोन पत्नींच्या वादाचा न्यायालयात सोक्षमोक्ष

मुंबई : करोनामुळे मृत्युमुखी पडलेले रेल्वे पोलीस अधिकारी सुरेश हातणकर यांच्या कुटुंबीयांना जाहीर झालेली नुकसानभरपाईची रक्कम वाटून घेण्याची तयारी त्यांची पहिली पत्नी, त्यांची मुलगी आणि दुसऱ्या पत्नीच्या मुलीने शुक्रवारी उच्च न्यायालयात दाखवली. त्यानंतर नुकसानभरपाईची प्रत्येकी एक तृतीयांश रक्कम त्या तिघींना देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

पतीच्या मालमत्तेवर पहिल्या पत्नीचाच अधिकार असतो. दुसरी पत्नी त्यावर हक्क सांगू शकत नाही. मात्र पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांप्रमाणेच दुसऱ्या पत्नीच्या मुलांनाही त्यावर हक्क सांगता येईल या उच्च न्यायालयाच्याच निकालाचा दाखला न्यायालयाने मागील सुनावणीच्या वेळी दिला होता. तसेच या प्रकरणी प्रत्यक्ष सुनावणी घेण्याचे स्पष्ट केले होते. त्यानुसार शुक्रवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी हातणकर यांच्या दोन्ही पत्नी आणि मुली या न्यायालयात हजर होत्या. अशा प्रकरणात कायदा काय सांगतो हे न्यायालयाप्रमाणे त्यांच्या वकिलांनी दोन्ही पक्षांना समजावून सांगितले. तसेच न्यायालयीन लढाईत वेळ घालण्याऐवजी दोन्ही बाजूंनी नुकसानभरपाईच्या रकमेचा वाद परस्पर सामंजस्याने सोडवण्याची सूचना केली.

ही सूचना मान्य असल्याचे दोन्ही बाजूंनी सांगितल्यावर रेल्वे पोलीस आणि राज्य सरकारने नुकसानभरपाईची न्यायालयात जमा केलेली रक्कम हातणकर यांची पहिली पत्नी तसेच त्यांच्या दोन्ही लग्नांतून झालेल्या दोन्ही मुलींना समान वाटण्यात यावी, असे आदेश न्यायमूर्ती शाहरूख काथावाला आणि न्यायमूर्ती माधव जामदार यांच्या खंडपीठाने दिले.

हातणकर यांच्या जंगम आणि स्थावर मालमत्तेसह निवृत्तिवेतनासह मिळणाऱ्या अन्य लाभांबाबतही याच निकालाच्या पार्श्वभूमीवर परस्पर सामंजस्याने निर्णय घेण्याचे न्यायालयाने स्पष्ट केले, तर हातणकर यांच्या दोन्ही मुली या सज्ञान असल्याने त्यांना त्यांच्या निवृत्तिवेतनावर मात्र त्यांच्या दोन्ही मुलींना हक्क सांगता येणार नाही, असे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर आदेशाची अंमलबजावणी झाली की नाही यासाठी न्यायालयाने प्रकरणाची सुनावणी ११ सप्टेंबरला ठेवली.