मुंबई हल्लाप्रकरणी ‘लष्कर-ए-तोयबा’चे (एलईटी) म्होरके हाफीज सईद आणि झकी-उर रहमान यांच्यावर पाकिस्तानात केली जाणारी कारवाई ही निव्वळ धूळफेक आहे. उलट २६/११च्या हल्ल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांनीच मुंबईजवळ पुन्हा हल्ला करण्याचा कट ते शिजवत होते, असा नवा गौप्यस्फोट पाकिस्तानी-अमेरिकन दहशतवादी डेव्हिड हेडली याने शनिवारी विशेष न्यायालयासमोर केला. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी त्याची साक्ष पूर्ण झाल्याचे जाहीर केले असून अबु जुंदालच्या वकिलांना २२ फेब्रुवारी रोजी उलटतपासणीचे वेळापत्रक सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.
मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानने सईद आणि लख्वी यांना अटक केली. तेव्हा मी एलईटीचा साजिद मीर आणि ‘अल-कायदा’चा मेजर पाशा यांच्याशी ई-मेलद्वारे संपर्कात होतो. मी या दोघांकडे सईद आणि लख्वीबद्दल काळजी व्यक्त करीत होतो. तेव्हा त्या दोघांवरील कारवाई ही धूळफेक आहे. दोघे व्यवस्थित आहेत. तू काळजी करू नकोस, असे मला सांगण्यात आले. उलट तुरुंगातही लख्वीचे मनौधैर्य उंचावलेले आहे. तर हाफीजाही वादळासारखा धडाका सुरूच आहे, असेही मला सांगितले गेले.