News Flash

२०१४ च्या निवडणुकीत दाऊद टोळीने भाजपला मदत केली – नवाब मलिक

रियाज भाटीला कोणाच्या आदेशावरुन पोलीस संरक्षण देण्यात आले असा प्रश्नच मलिक यांनी उपस्थित केला आहे.

गुंड टोळ्यांशी संबंध असूनही रियाज भाटी याच्यावर १०० दिवसांत आरोपपत्र का दाखल करण्यात आले नाही असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे.

गंभीर गुन्हे दाखल असलेल्या रियाज भाटी याचा भाजपच्या कार्यकारिणीत समावेश करण्यावरुन सुरु झालेला वाद काही शमण्याची चिन्हे नाहीत. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत दाऊदचा हस्तक असलेला रियाज भाटी हा आशिष शेलारांसाठी काम करत होता आणि संपूर्ण मुंबईत भाजपला दाऊद टोळीनेच मदत केली असा गंभीर आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी शुक्रवारी पुन्हा एकदा ट्विटरच्या माध्यमातून रियाज भाटी आणि भाजपवर निशाणा साधला आहे. भाजपचे सरकार येताच रियाज भाटीला कोणाच्या आदेशावरुन पोलीस संरक्षण देण्यात आले असा प्रश्न नवाब मलिक यांनी उपस्थित केला आहे. फुलजी भाटी नामक तरुण जोहान्सबर्गला दाऊदच्या पार्टीला जाताना मुंबई विमानतळावर पकडला गेला होता. पोलीस चौकशीत या फुलजी भाटी याचे खरे नाव रियाज भाटी असल्याचे समोर आले होते. त्याच्याकडे दोन नावाने बोगस पासपोर्ट आढळले होते असा आरोप नवाब मलिक यांनी केला आहे. राजस्थानमध्ये भाजपचे सरकार येताच रियाज सक्रीय झाला. २०१४ मध्ये आशिष शेलारांच्या मतदारसंघात रियाज सक्रीय होता असा दावाही मलिक यांनी केला आहे. वर्सोवासारख्या ताकद नसलेल्या भागातही भाजपचा उमेदवार निवडून येतो. अंधेरी पश्चिममध्येही दाऊदच्या टोळीनेच भाजपसाठी काम केले असा आरोपही त्यांनी केला.

रियाज भाटी हा मुंबई क्रिकेट संघटनेचा सदस्य असून त्याबाबत शरद पवारांनाच विचारावे असा पलटवार भाजप प्रवक्ते माधव भंडारी यांनी गुरुवारी केला होता. भाजपच्या या आरोपावर मलिक म्हणाले, रियाज हा आशिष शेलारांच्या माध्यमातूनच एमसीएमध्ये आला. रियाजचे शरद पवार, उद्धव ठाकरे तसेच साक्षी मलिकसोबतही फोटो आहेत. पण रियाजला अटक झाल्यावर त्याचे एमसीएतील सदस्यत्व रद्द करण्यात आले असा दावाही मलिक यांनी केला आहे.

मलिक यांच्या टीकेला आशिष शेलार यांनीदेखील प्रत्युत्तर दिले आहे. नवाब मलिक यांना स्मृतीभ्रंश झाला असावा. गुंड आणि टोळ्यांची गरज त्यांनाच भासत असावी असे आशिष शेलार म्हणालेत. दाऊदचा बीमोड करण्यासाठी मुख्यमंत्री सज्ज असून मी बिनबुडाचे आरोप करणा-या सुपारी गँगचा बीमोड करण्यास मी समर्थ आहे असे शेलार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. नवाब मलिक यांच्यावर मानहानीचा खटला दाखल करणार असून रियाज भाटी प्रकरणाच्या चौकशीसाठी मी स्वतः पोलीस आयुक्तांकडे चौकशीची मागणी केली आहे असे शेलार यांनी स्पष्ट केले. भाजपच्या जुन्या कार्यकार्यकारिणीत त्याचा समावेश रियाजचा समावेश नव्हता. तसेच नवीन कार्यकार्यकारणीही नेमण्यात आलेली नाही असे शेलार यांनी  आवर्जून नमूद केले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:50 pm

Web Title: dawood gang helped bjp in 2014 election alleges nawab malik
Next Stories
1 मोदींवर टीका करणाऱ्यांना अंगावर घेण्याची हिंमत आहे काय? सेनेचा भाजपला सवाल
2 मुंबई सेंट्रल आगार पुन्हा गजबजणार!
3 परवडणारे घर ६० लाखांचे!
Just Now!
X