मुंबईतील भीषण बॉम्बस्फोट मालिकेचा प्रमुख सूत्रधार व कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याची बहीण हसीना पारकर ऊर्फ हसीनाआपा हिचा रविवारी दुपारी हृदयविकाराने मृत्यू झाला. दक्षिण मुंबईतील दाऊदची बेनामी मालमत्ता सांभाळणाऱ्या हसीना हिचा ‘दाऊदची बहीण’ म्हणून दबदबा होता़
गेल्या वर्षी एप्रिलमध्ये तिचा मुलगा दानिश याचा अपघातात मृत्यू झाल्यानंतर ती खचली होती. त्यातच तिला मायग्रेनचा विकार जडला होता. तरीही तिची जरब होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. नागपाडा येथील आलिशान ‘गॉर्डन हाऊस’मधून ती सध्या उपनगरात वास्तव्याला गेली होती. मात्र तिचे बऱ्याचवेळा नागपाडय़ात वास्तव्य असायचे. रविवारी दुपारी तिला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि डोंगरीतील हबीबा रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.
दक्षिण मुंबईत दाऊदच्या तब्बल ५४ बेनामी मालमत्ता असून त्या हसीना सांभाळीत होती, असे म्हटले जाते. याशिवाय झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात झोपुवासीयांची मंजुरी मिळवून देणे वा आवश्यकता भासल्यास संरक्षण देणे, हवालाद्वारे पैसे पाठविणे, हिंदूी चित्रपटांचे विशेषत: मध्य रशिया आणि आखाती देशांतील हक्क, केबलचालकांमध्ये मध्यस्थी आणि खंडणीखोरी आदी प्रकरणांत तिचे नाव घेतले जात होते. परंतु आतापर्यंत तिच्यावर खंडणीखोरीचा एकच गुन्हा दाखल झाला आहे. वडाळा येथे एका झोपु प्रकल्पात विनोद अळवणी याने आर्थिक मदत मिळवून दिली होती. परंतु काही कारणास्तव हा प्रकल्प रखडला. मात्र पैसे परत देण्याची वेळ आली तेव्हा तिने खंडणी घेतली, असा आरोप होता. या प्रकरणी गुन्हे अन्वेषण विभागाने गुन्हा दाखल केला होता.