अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या मुंबईतील नागपाडा भागातील फ्लॅटचा लिलाव झाला आहे. लिलावात १.८० कोटी रुपयांना या फ्लॅटची विक्री झाली. सफीमा कायद्यातंर्गत या फ्लॅटचा लिलाव करण्यात आला.

एसएएफइएमए आणि एनडीपीएस विभागाने या फ्लॅटचा लिलाव केला. सीबीआयने २०१४ साली हा फ्लॅट जप्त केला होता.लिलावामध्ये १.६९ कोटी रुपयापासून बोली लागण्यास सुरुवात झाली. दाऊदच्या बहिणीचा हसीनाचा २०१४ साली मृत्यू झाला. त्याआधी ती नागपाडयाच्या या फ्लॅटमध्ये राहत होती. फ्लॅटच्या लिलाव प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी २८ मार्च अर्ज करण्याची शेवटची तारीख होती.

लिलावामध्ये सहभागी होण्यासाठी ३० लाख रुपये जमा करावे लागणार होते. १.६९ कोटी रुपये या फ्लॅटची किंमत ठेवण्यात आली होती. दाऊदच्या कमाईतून खरेदी करण्यात आलेल्या या फ्लॅटवर १९९७ साली सुद्ध सीबीआयने ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला होता. हसीना पारकर याच फ्लॅटमधून कारभार चालवायची. हसीनच्या मृत्यूनंतर हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते.