‘मॅट’मध्ये आव्हान

मुंबई : महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाने (मॅट) पोलीस निरीक्षक दया नायक यांचे बदली आदेश बुधवारी स्थगित के ले. तसेच अंतिम निर्णय होईपर्यंत नायक यांना राज्य दहशतवादविरोधी पथकात (एटीएस) कर्तव्य बजावण्याची मुभा दिली. ही बदली जनहितार्थ आणि प्रशासकीय निकडीनुसार के ल्याचा एकही पुरावा पोलिसांकडे नाही, असेही मॅटने आपल्या आदेशात नमूद के ले.

राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनी ६ मेला नायक यांचे बदली आदेश जारी के ले. प्रशासकीय कारणास्तव नायक यांची एटीएसमधून गोंदिया येथील जिल्हा जात पडताळणी समितीवर नेमणूक के ल्याचे या आदेशात नमूद होते. या आदेशास नायक यांनी मॅटमध्ये आव्हान दिले.

सप्टेंबर २०१९मध्ये त्यांची मुंबई पोलीस दलातून एटीएसमध्ये बदली करण्यात आली.  या नेमणुकीचा तीन वर्षांपैकी निम्मा कार्यकाळ शिल्लक असतानाच, अचानक त्यांची बदली करण्यात आली. महाराष्ट्र पोलीस कायद्यातील २२(एन) या कलमानुसार कोणतीही अपवादात्मक परिस्थिती नसतानाही महासंचालक कार्यालयाने जारी के लेले बदली आदेश कायदा आणि नियमांना धरून नाहीत, असा दावा नायक यांच्यावतीने अ‍ॅड. मकरंद लोणकर यांनी मॅटसमोर के ला. याआधीही २०१४ मध्ये नायक यांची बदली नागपूर येथे करण्यात आली होती. मात्र तत्कालीन महासंचालकांनी संघटित गुन्हेगारी टोळ्यांकडून संभाव्य धोका असल्याने नायक यांची बदली रद्द करून मुंबईत नेमणूक द्यावी, अशी विनंती शासनाकडे के ली होती. ती शासनाने मंजूरही के ली. २०१८ मध्ये नायक यांना बढती दिली गेली. त्यांचा निलंबन कार्यकाळ नियमित करण्यात आला, आदी मुद्देही अ‍ॅड. लोणकर यांनी मॅटसमोर ठेवले.