पिझ्झामध्ये मेलेली पाल सापडल्यानंतर हे प्रकरण मिटविण्यासाठी संबंधित दुकानाच्या व्यवस्थापकाकडून पाच लाख रूपयांची खंडणी मागणाऱ्या दोघांना मंगळवारी कांदिवली पोलीसांनी अटक केली. मिर्झा बेग आणि युसूफ सलीम अशी नावे असणारी हे दोघेजण रविवारी येथील महावीर नगर भागातील पिझ्झाच्या दुकानात गेले होते. त्यावेळी हा प्रकार घडला. त्यावेळी या दोघांनी पिझ्झा मागविला होता. मात्र, जेव्हा ते हा पिझ्झा खायला गेले, तेव्हा त्यामध्ये त्यांना मेलेली पाल आढळून आली. तेव्हा मिर्झा बेग आणि युसूफ सलीम या दोघांनी पिझ्झाचे चित्रीकरण करून घेतले. त्यानंतर त्यांनी दुकानाचा व्यवस्थापक मनोज मोहन कोटापिरत याला बोलावून घेतले. व्यवस्थापकाने हे प्रकरण मिटवून टाकण्यासाठी दोघांना विनंती केली. तेव्हा या दोघांनीही प्रकरण मिटवण्याच्या मोबदल्यात पाच लाख रूपयांची मागणी केल्याचे मनोज कोटपिरत यांनी पोलीसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
अन्न आणि औषध प्रशासनाला या प्रकरणाची तक्रार न करण्यासाठी या दोघांनी पैशाची मागणी करतानाचे संपूर्ण चित्रीकरण दुकानाच्या व्यवस्थापकाने पोलीसांना दिले आहे. त्यानंतर पोलीसांनी मिर्झा बेग आणि युसूफ सलीम यांच्याविरोधात खंडणीखोरीचा गुन्हा नोंदविला. दरम्यान, पिझ्झामध्ये खरोखरच मेलेली पाल सापडली होती का, याचा तपास करत असल्याची माहिती पोलीसांनी दिली.