घरातल्या कर्त्यां व्यक्तिचे अचानक निधन होते व या धक्क्यातून सावरत असतानाच भविष्यातील जगण्याचे संकट समोर उभे ठाकते.. अशा वेळी सारे मार्ग खुंटल्याचे वाटत असतानाच अचानक भविष्यनिर्वाह निधीचे(पीएफ) अधिकारी-कर्मचारी दारी येतात आणि भविष्यनिर्वाह निधी किंवा निवृत्तीवेतनाची रक्कम सोपवतात.. देशातील सध्याच्या सरकारी कारभाराकडे पाहिल्यास हे सारे चित्र स्वप्नच वाटेल. पण मुंबईतील मृत पीएफधारकांच्या कुटुंबियांना हा अनुभव प्रत्यक्षात येतो आहे.
मुंबईतील कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी आयुक्तांनी मानवतेच्या भावनेतून हा अभिनव उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत दुखद निधन, दशक्रिया विधी अशा वृत्तपत्रातील जाहिराती किंवा अपघात, दुर्घटनांच्या बातम्या वाचून भविष्यनिर्वाह निधीचे अधिकारी-कर्मचारी संबंधितांच्या घरी जातात आणि त्यांना वारसाहक्काने मिळणारी भविष्यनिर्वाह निधी किंवा निवृत्तीवेतनाची रक्कम सोपवून जातात. माहीम, वांद्रे येथील स्मशानभूमीत लाकडे पुरविणाऱ्या कर्मचाऱ्यांकडेही भविष्यनिर्वाह निधी मदत अधिकाऱ्याचा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. गेल्या चार महिन्यांत दीडशेहून अधिक व्यक्ती आणि त्यांच्या कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे.
विभागीय भविष्यनिर्वाह निधी आयुक्त के. एल. गोयल यांनी पदभार स्वीकारल्यावर जनकल्याणाच्या भावनेतून ही योजना सुरू करण्याचा निर्णय जूनमध्ये घेतला. त्यासाठी अविनाश ठाकूर यांची विशेष अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून नियुक्ती केली. सध्या ती मुंबईपुरती सुरू केली आहे.

अनुभूतीचे बोल..
*    संदीप मेहता हे पुण्यातील एक अपंग गृहस्थ. कंपनी बंद झाल्याने त्याचे पीएफचे पैसे अनेक वर्षे अडकले होते. त्याची २६ सप्टेंबरला माहिती मिळताच केवळ पाच दिवसांत एक लाख ३६ हजार रुपये त्यांना देण्यात आले.    
*    रामदास नायर व दिगंबर नर यांचा पीएफ कंपनीकडे होता व कंपनीच्या ट्रस्टचा परवाना रद्द झाल्यावर कर्मचारी भविष्यनिर्वाह निधीकडे सर्व निधी आलेला नव्हता. गोयल व ठाकूर यांनी तातडीने चक्रे फिरवून त्यांना पीएफमधील पाच लाखाहून अधिक रक्कम त्यांना सुपूर्द केली.
*    खासगी शाळेतील रोहिणी कोरगावकर यांचे कर्करोगाने निधन झाल्यावर वांद्रे स्मशानभूमीतील काही लोकांकडून ठाकूर यांच्यापर्यंत माहिती गेली.
त्यांचे पती रिक्षाचालक आहेत. त्यांना पीएफचे एक लाख ६३ हजार व विम्याचे ९० हजार रुपये तातडीने देण्यात आले.

मुंबईतील खातेदारांसाठी संपर्क- अविनाश ठाकूर, विशेष अधिकारी, जनसंपर्क, भविष्यनिर्वाहनिधी कार्यालय, वांद्रे. दूरध्वनी- २६४७०५९१, भ्रमणध्वनी- ८०८०७४७३७३