विधान परिषदेच्या चार जागांकरिता होणाऱ्या पोटनिवडणुकीत आपल्याला प्रतिनिधीत्व द्यावे म्हणून मित्र पक्षांचा दबाव असतानाच भाजपमध्ये उमेदवारीवरून चुरस निर्माण झाल्याने भाजपची कोंडी झाली आहे.
चार जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीकरिता उमेदवारी अर्ज भरण्याची उद्यापर्यंत मुदत आहे. प्रत्येक जागेसाठी स्वतंत्र निवडणूक असल्याने सत्ताधारी युतीच्या चारही जागा निवडून येणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपला साथ दिलेल्या चारही मित्र पक्षांनी आमदारकीवर दावा केला आहे. एक जागा शिवसेनेचे सुभाष देसाई यांच्यासाठी सोडावी लागणार आहे. म्हणजेच तीन जागांच्या माध्यमातून मित्र पक्षांचे समाधान करायचे आहे.
धनगर समाजाची मते लक्षात घेता महादेव जानकर यांना आमदारकी व नंतर मंत्रिपद देण्यात येणार आहे. आमदारकीवर पाणी सोडून आपण भाजपला साथ दिली. यामुळेच अपात्र ठरविले गेले. तेव्हा आपल्यालाच संधी मिळाली पाहिजे, असा आग्रह विनायक मेटे यांनी धरला आहे. भाजपमध्ये प्रवेश केल्याने मेटे यांना अपात्र ठरविण्यात आले होते. राजू शेट्टी यांचा स्वाभिमान शेतकरी संघटना आणि रामदास आठवले यांच्या रिपब्लिकन पक्षाने आमदारकीवर दावा केला आहे. कोणाला सामावून घ्यायचे यावर भाजपमध्ये शेवटपर्यंत खल सुरू होता.
भाजपमध्येही आमदारकीसाठी मोठी स्पर्धा आहे. मुंबईतील विविध कार्यक्रमांमध्ये मिरविणाऱ्या शायना एन. सी., पक्षाचे प्रवक्ते माधव भांडारी, सुरजिंतसिंह ठाकूर यांच्यात चुरस आहे. पक्षाचा उमेदवार निश्चित करणे तसेच कोणत्या मित्र पक्षांना जागा सोडायच्या याचा निर्णय घेण्याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यात चर्चा झाली.