|| संदीप आचार्य/सुहास सरदेशमुख

हेडगेवार रुग्णालयात मोफत कॉक्लिअर प्रत्यारोपण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून मराठवाडय़ातील पाच वर्षांच्या आतील १०० कर्णबधिर मुलांवर आगामी वर्षांत मोफत कॉक्लिअर प्रत्यारोपण करण्यात येणार आहेत. या शस्त्रक्रियांसाठी ‘मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधी’ व ‘टाटा ट्रस्ट’ यांच्याकडून औरंगाबादच्या हेडगेवार रुग्णालयाला आर्थिक मदत मिळणार असून या उपक्रमाचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले.

या योजनेअंतर्गत टाटा ट्रस्टकडून प्रति रुग्ण पाच लाख रुपये, तर मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीतून दोन लाख रुपये देण्यात येणार असून उर्वरित खर्च हा हेडगेवार  रुग्णालय व रुग्णाकडून घेतला जाणार आहे. जन्मत: कर्णबधिर असलेल्या बालकांवर पाच वर्षांच्या आत प्रामुख्याने ही शस्त्रक्रिया करण्यात येत असून, शस्त्रक्रियेनंतर सुमारे दीड वर्षे बालकाला बोलण्यास शिकवावे लागते.

औरंगाबादचे हेडगेवार रुग्णालय हे  गोरगरीब रुग्णांसाठी  जीवनदायी ठरले आहे. दोन वर्षांपासून येथील कान-नाक-घसा उपचार विभागात कॉक्लिअर इंप्लांटच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. शस्त्रक्रियेनंतर पुढील सहा महिने या मुलांना स्पिच थेरपी देणारे डॉक्टरांचे पथक आमच्याकडे असल्याचे रुग्णालयाचे संचालक डॉ. प्रसन्न पाटील यांनी सांगितले. आजघडीला  १०० हून अधिक मुले शस्त्रक्रियेच्या प्रतीक्षेत असून यातील बहुतेकांकडे पैसे नाहीत. यामुळे आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मुख्यमंत्री वैद्यकीय साहाय्यता निधीचे प्रमुख ओम शेटय़े यांच्याकडे संपर्क साधल्याचे डॉ. पाटील म्हणाले.