मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज असून यासाठी ‘मराठीत बोला, मराठीतून व्यवहार करा आणि मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी केले.

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडय़ानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

मराठी भाषामंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात या पंधरवडय़ाचे उद्घाटन झाले. राज्य शासनाच्या वतीने १४ ते २८ जानेवारी २०२१ या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जाणार असून त्यानिमित्ताने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजूषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

प्रत्येक विभागातील कारभार मराठीतून झाला पाहिजे. बँक, पोस्ट, रेल्वे या ठिकाणी मराठी भाषेमधून व्यवहार व्हावा यासाठी आग्रह धरला पाहिजे. केंद्राच्या कार्यालयातील कारभार मराठी भाषेतून व्हावा असे केंद्राचे धोरण आहे. या धोरणाचा त्या ठिकाणी प्राधान्याने वापर व्हावा. केंद्रीय कार्यालयात दर्शनी भागावर मराठीमध्ये फलक लावण्यात यावे, असेही देसाई यांनी सांगितले.