मुंबई पोलीस भरतीच्या वेळी शारीरिक चाचणी परीक्षेच्या वेळी धावताना झालेल्या चार तरुणांच्या मृत्यूच्या चौकशी अहवाल तयार झाला असून तो लवकरच आयुक्तांकडे सादर केला जाणार आहे. या चौघा तरुणांपैकी एकाचा मृत्यू डेंग्यूने तर अन्य एकाचा मृत्यू न्युमोनियाने झाल्याचा वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.
मुंबई पोलीस दलातील भरतीसाठी जून महिन्यात विक्रोळी येथे भरती प्रवेश प्रक्रिया झाली होती. या वेळी धावण्याच्या चाचणीत नाशिकमधील बबन सोनावणे, विशाल केदारे, विक्रोळी येथील राहुल सकपाळ तसेच बीड येथील गहिनिनाथ लटपटे या चार तरुणांचा मृत्यू झाला होता. धावताना ते अचानक खाली कोसळले होते. रुग्णालयात उपचारावेळी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणाच्या चौकशीसाठी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी गुन्हे शाखेची एक चौकशी समिती नेमली होती. वैद्यकीय तपासणीसाठी मृतदेह जे.जे. आणि राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आले होते. त्याचा वैद्यकीय अहवाल चौकशी समितीला मिळाला आहे. त्यानुसार बबन सोनावणे या तरुणाचा मृत्यू डेंग्यूने तर राहुल सकपाळ याचा मृत्यू न्युमोनियाने झाल्याचे स्पष्ट करण्यात आला आहे. अन्य दोन तरुण विशाल केदार आणि गहिनीनाथ लटपटे या दोघांचा मृत्यू धावताना धाप लागल्याने झाल्याचे नमूद करण्यात आले आहे. शारीरिकदृष्टय़ा ते तंदुरूस्त नव्हते. धाप लागली तरी ते धावत होते. त्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे या वैद्यकीय अहवालात म्हटले आहे. गुन्हे शाखेच्या चौकशी समितीने चौघांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करणारा हा अहवाल तयार केला असून तो लवकरच पोलीस आयुक्त राकेश मारिया यांच्याकडे सुपूर्द केला जाणार आहे.