काही वेळापूर्वीच हिमाचल प्रदेशात ट्रेकसाठी गेलेल्या मुंबईतील 12 जणांची सुटका झाल्याची बातमी काही वेळापूर्वीच आली. मात्र या 12 जणांपैकी एका गिर्यारोहकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हर्षद आपटे असे या ट्रेकरचे नाव आहे. तो बदलापूरचा राहणारा होता. 7 जून रोजी हर्षद आपटे 11 जणांच्या टीमसोबत उत्तराखंडमध्ये गिर्यारोहणसाठी गेला होता. 12 जणांच्या चमूत 4 जण बदलापूरचे होते. 9 तारखेला त्यांनी ट्रेकिंगची सुरुवात केली. 15 तारखेला ट्रेक संपवून हे सगळे जण बेस कँपकडे परतत होते. मात्र शेवटच्या टप्प्यात हर्षदला श्वसनाचा त्रास होऊ लागला. ऑक्सिजनची कमतरता आणि श्वसनाचा त्रास या दोन्ही कारणांमुळे हर्षदला तातडीने खाली आणण्यात आले. मात्र तोवर त्याचा मृत्यू झाला होता.

हर्षदच्या मृत्यूची माहिती मिळताच हर्षदचे कुटुंबीय शुक्रवारी बदलापूरहून उत्तराखंडसाठी रवाना झाले आहेत. 33 वर्षांचा हर्षद विवाहित असून त्याला 4 वर्षांची मुलगीही आहे. या घटनेमुळे आपटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हर्षदची पत्नी, लहान मुलगी आणि आजारी वडिल बदलापूर येथील घरी आहेत. तर हर्षदची आई, बहिणीचे मिस्टर आणि काका उत्तराखंडला गेले आहेत अशीही माहिती मिळते आहे. बदलापूर एमआयडीसी भागात असलेल्या केमिकल फॅक्टरींचे काम हर्षद पाहात होता. बदलापुरातील गांधी चौकात काटधरे मंगल कार्यालयाजवळ आपटे यांची डेअरीही आहे. हर्षदचे वडिल आजारी असतात त्यांना त्याच्या मृत्यूचा धक्का सहन होणार नाही असे शेजाऱ्यांचे म्हणणे आहे.