२९ ऑगस्ट रोजी मुंबईत जो पाऊस झाला तो पाऊस म्हणजे २६ जुलै २००५ ची आठवण करून देणाराच ठरला. या पावसाने वेगवान मुंबईचा वेग अक्षरशः थांबवला. ऑफिसला जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हाल, रूळांवर साठलेले पाणी, ट्रेनमध्ये अडकलेले प्रवासी, त्यांना मदत करणाऱ्या समाजसेवी संस्था असे सगळे चित्र पुन्हा एकदा दिसून आले. अशाच मुसळधार पावसात कमरेइतक्या पाण्यातून वाट काढत ऑफिस गाठणाऱ्या एका कर्मचाऱ्याचा हार्ट अॅटॅक आल्याने मृत्यू झाला आहे. कृष्णकुमार शर्मा असे त्यांचे नाव असून ते नवी मुंबईतील खारघर या ठिकाणी राहात होते.

कृष्णकुमार हे ६० वर्षांचे होते, त्यांच्यामागे त्यांची पत्नी, तीन मुले आणि एक मुलगी असे कुटुंब आहे. ते मस्जिद बंदर या ठिकाणी असलेल्या एका ट्रान्सपोर्ट कंपनीत काम करत होते. २९ तारखेच्या दिवशी खारघरहून कृष्णकुमार शर्मा यांनी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी ट्रेन पकडली आणि प्रवासाला सुरूवात केली. त्यानंतर चुनाभट्टी स्टेशनजवळ त्यांची ट्रेन बराच काळासाठी थांबली.  ही ट्रेन कशीबशी कुर्ला या स्टेशनपर्यंत पोहचली आणि रद्द झाल्याची घोषणा करण्यात आली.

मस्जिद बंदर स्टेशन गाठण्यासाठी अर्थातच ऑफिसला जाण्यासाठी काहीही पर्याय न उरल्यामुळे कृष्णकुमार शर्मा यांनी, इतर अनेक प्रवाशांप्रमाणे ट्रेनमधून उतरून चालत जात ऑफिस गाठण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हाच निर्णय त्यांच्या जीवावर बेतला. पुढे काय होणार आहे याची कल्पना नसलेले कृष्णकुमार कमरेइतक्या पाण्यातून चालत ऑफिस गाठण्यासाठी वाट काढू लागले. साधारण ५०० मीटर अंतर चालून गेल्यावर कृष्णकुमार यांना चक्कर आली आणि ते कोसळले. त्यांच्यासोबत चालणाऱ्या इतरांनी हा सगळा प्रकार पाहिला आणि त्यांना तातडीने रूग्णालयात दाखल केले. मात्र रूग्णालयात नेण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती कृष्ण कुमार यांचा भाऊ हरि कुमार यांनी दिली आहे.

या सगळ्या घटनेनंतर २९ ऑगस्टला दुपारी ४.१५ च्या सुमारास कृष्णकुमार यांच्या मुलाला त्यांच्या ऑफिसमधून या घटनेसंदर्भातला फोन आला आणि  कृष्णकुमार यांचा मृत्यू झाल्याचे त्याला समजले अशी माहिती हरि कुमार यांनी ‘हिंदुस्थान टाइम्स’ या वेबसाईटला दिली आहे. कृष्णकुमार यांना कमरेइतक्या पाण्यातून चालत जात असतानाच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला, असेही हरिकुमार यांनी स्पष्ट केले आहे.

‘व्यवस्था चांगली आहे’, ‘मुंबई पावसात तुंबणार नाही’, ‘रस्ते चांगले आहेत’ ही आणि अशी अनेक पोकळ आश्वासने देणारे सरकार, प्रशासन अशा मृत्यूंची जबाबदारी स्वीकारणार का? असा प्रश्न आता मुंबईकर विचारू लागले आहेत.