अन्नविषबाधेमुळे दगावल्याचा संशय; चार मुलांवर उपचार सुरू
उलटय़ा-जुलाब होऊ लागल्यानंतर खासगी रुग्णालयात दाखल केलेल्या चेंबूरच्या बाल आनंद आश्रमातील सहा बालकांपैकी एकाचा बुधवारी, तर दुसऱ्याचा गुरुवारी मृत्यू झाला. खुशी (वय ६ महिने) आणि जयदीप (१० महिने)अशी या बालकांची नावे आहेत. अन्नविषबाधेमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
चेंबूरच्या घाटला गावात ‘वर्ल्ड चिल्ड्रन वेल्फेअर ट्रस्ट, इंडिया’ या संस्थेचा घाटला गावात ‘बाल आनंद आश्रम’ आहे. १९८४ साली या आश्रमाची स्थापना झाली असून आई-वडिलांपासून दुरावलेल्या मुलांचा सांभाळ या आश्रमात करण्यात येतो. तेथील सहा मुलांना बुधवारी (२६ डिसेंबर) उलटय़ा-जुलाब होऊ लागल्याने खासगी रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान दोन बालकांचा मृत्यू झाला, तर चार बालकांवर उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासामध्ये मुलांना विषबाधा झाल्याचा अंदाज डॉक्टरांनी वर्तवला आहे. मात्र आद्यापही या मुलांचा शवविच्छेदन अहवाल आलेला नाही. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे गोवंडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शशिकांत माने यांनी सांगितले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 30, 2018 12:16 am