19 February 2019

News Flash

कासवांना मरण यातना

वेळीच उपचार न मिळाल्याने दुर्मिळ कासवे नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

मुंबईत सागरी कासवांवर उपचार करणारे एकही केंद्र नसल्याने मुंबईच्या किनारी भागात येणाऱ्या सागरी कासवांना केवळ मरण यातना भोगाव्या लागत आहेत.  दोन दिवसापूर्वीच जुहू किनाऱ्यावर गंभीर जखमी अवस्थेत सापडलेल्या कासवालाही डहाणू येथेच रवाना करण्यात आले. त्यामुळे वेळीच उपचार न मिळाल्याने दुर्मिळ कासवे नामशेष होण्याची भीती व्यक्त होत आहे.

ऑलिव्ह रिडले ही समुद्रात आढळणारी कासवांची जात सध्या धोकादायक अवस्थेत येऊन पोहचली आहेत. माश्यांचे जाळे, बोटींचे पंखे अशा मानवाकडून वापरण्यात येणाऱ्या उपकरणांतून ही कासवे जखमी होत असल्याचे निदर्शनास आले आहे. सागरी किनाऱ्यापासून किमान दहा किलोमीटर आत आढळणारी ही कासवे जखमी झाल्यावर किनाऱ्यावर येऊन पोहचतात. मुंबईच्या किनाऱ्यावर फारशी न आढळणारी ही कासवे गेल्या एक ते दीड महिन्यापासून जखमी अवस्थेत दिसू लागली आहेत. दोनच दिवसांपूर्वी जुहूच्या किनाऱ्यावर एक पंख तुटलेले ऑलिव्ह रिडले कासव गंभीर जखमी अवस्थेत आढळले होते. मुंबईच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी ‘रेसक्यूंक असोसिएशन फॉर वाईल्डलाईफ वेल्फेअर’ (रॉ) या प्राणी मित्र संघटनेच्या मदतीने या कासवाला मुंबईतील डॉ. दिनेश विन्हेरकर यांच्या रूग्णालयात प्राथोमिक उपचारासाठी दाखल केले. कासवाला खोल जखमा असल्याने व एक पंख तुटला असल्याने त्याला डहाणू येथील ‘वाईल्ड लाईफ कॉन्झर्वेशन अ‍ॅण्ड अ‍ॅनिमल ऑर्गनायझेशन’ या प्राणी मित्र संस्थेच्या उपचार केंद्रात दाखल केले. जाळ्यात अडकून त्याचा पंख तुटल्याची शक्यता ‘रॉ’ संस्थेचे पवन शर्मा यांनी व्यक्त केली.  एक महिन्यापूर्वी असे पंख तुटलेले कासव आढळले मात्र, त्याचा काही दिवसातच मृत्यू झाला, असे त्यांनी सांगितले.

सध्या राज्यात डहाणू येथे असलेले  कासवांवरील उपचार केंद्र सागर किनाऱ्यावर असण्याची आवश्यकता आहे. खारे पाणी रूग्णालयात घ्यावे लागते. यात सुधारणा होण्याची आवश्यकता आहे.  केंद्रातून आजवर ५० सागरी कासवे उपचार होऊन सोडून देण्यात आली तर, सध्या १४ कासवे  उपचारासाठी दाखल आहेत.

– डॉ. दिनेश विन्हेरकर, पशू वैद्य

मुंबईच्या किनारी भागात वारंवार सागरी कासवे आढळत नाहीत. त्यामुळे सागरी कासवांवरील उपचार केंद्र डहाणूत आहे. भविष्यात प्रत्येक जिल्ह्यात  रूग्णालय उभारण्याचे आमच्या विचाराधीन आहेत.

– एन. वासुदेवन, खारफुटी केंद्राचे प्रमुख, मुंबई

First Published on August 19, 2016 3:19 am

Web Title: death pain tortoise