केवळ क्रूरता हा मुद्दा एखादे प्रकरण ‘दुर्मीळातील दुर्मीळ’ ठरविण्यास पुरेसे नसल्याचे स्पष्ट करत न्यायालयाने नालासोपारा येथील चंद्रकांत आयरे याला कनिष्ठ न्यायालयाने सुनावलेली फाशीची शिक्षा रद्द केली. परंतु न्यायालयाने त्याला जन्मठेप सुनावत ३० वर्षे कारागृहात काढल्याशिवाय त्याची सुटका केली जाऊ नये, असेही स्पष्ट केले. पत्नी आणि मुलीचे डोके दगडाने ठेचून त्यांची हत्या केल्यानंतर आयरे याने त्यांचे मुंडके धडापासून वेगळे केले होते. न्यायमूर्ती विद्यासागर कानडे आणि न्यायमूर्ती अनुजा प्रभुदेसाई यांच्या खंडपीठाने याची फाशी रद्द करत त्याला जन्मठेप सुनावली. आयरे हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे त्यामुळे त्याला दया दाखवली तर तो समाजासाठी धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे त्याला सुधारण्याची संधीच दिली जाऊ शकत नाही, हे स्पष्ट करणारा कुठलाही पुरावा पुढे आलेला नाही. शिवाय त्याने केलेला गुन्हा हा पूर्वनियोजित, आमिषापोटी केल्याचा असल्याचाही कुठला पुरावा समोर आलेला नाही.