प्रत्येक गंभीर रुग्णाला मलपात्र पुरवण्याची पालिका आयुक्तांची सूचना

मुंबई : गंभीर रुग्णाच्या खाटेजवळ मलपात्र नसणे, त्याला गरज लागल्यास ते देणारी व्यक्ती आसपास नसणे अशी कारणे रुग्णालयातील करोनाबाधितांच्या मृत्यूला कारणीभूत ठरत आहेत. त्यामुळे प्रत्येक गंभीर रुग्णाला एक मलपात्र पुरवण्याची व्यवस्था करावी, अशी मूलभूत सूचना पालिका आयुक्तांना करावी लागली आहे. कारण अनेक करोनाबाधितांचे मृत्यू रात्री-अपरात्री झाल्याचे निदर्शनास आले आहे.

मुंबईतील ५७ टक्के रुग्ण करोनामुक्त झालेले असले तरी मृत्यूदर गेल्या काही दिवसात ५.८ टक्क्यांवर गेला आहे. मुंबईत आतापर्यंत ४४६१ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. त्यात ५० वर्षांवरील रुग्णांचा मोठय़ा संख्येने समावेश आहे. त्यात रुग्णालयातील अनेक मृत्यू मध्यरात्री एक ते पहाटे पाच या वेळेत झाल्याचे दिसून येते. या वेळी रुग्ण शौचालयात जाण्यासाठी ऑक्सिजनचे यंत्र काढून ठेवतात आणि ऑक्सिजन पुरवठय़ाअभावी मृत्यू होत आहेत. रात्री-अपरात्री होणारे हे मृत्यू टाळण्यासाठी प्रत्येक रुग्णाजवळ एक मलपात्र असणे आवश्यक आहे. किमान चार बेडसमवेत एक शौचकूप असावे. कार्डबोर्डपासून बनवलेले मलपात्रही वापरले जाऊ शकते. याबाबत प्रत्येकाने आपापली जबाबदारी पार पाडणे आवश्यक आहे. मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी पालिकेने ‘प्राण वाचवा कृती आराखडा’ तयार केला असून त्यात ही सूचना करण्यात आली आहे. पालिकेच्या रुग्णालयांमध्ये कोविड मृत्यूदर आणखी कमी व्हावा यासाठी पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी महापालिका सांघिक कृती कार्यक्रम निश्चित करून दिला आहे.

रुग्णाची देखरेख, ऑक्सिजन, औषधे इत्यादी मृत्यू विश्लेषण समितीने अहवालात नमूद केलेल्या उपचारांच्या नियमावलीचे काटेकोरपणे प्रमुख रुग्णालयांमध्ये पालन केले जात असले तरी प्रत्येक रुग्णालयांमध्ये होत नाही. त्यामुळे यांची अंमलबजावणी जरी योग्यरीतीने झाली तरी मृत्यूदर नक्कीच कमी होऊ शकतो, असे समितीचे प्रमुख डॉ. अविनाश सुपे यांनी व्यक्त केले. उपचारांवर देखरेख होणे अत्यावश्यक असल्याने नियमावलीच्या अंमलबजावणीवर भर देणे अत्यावश्यक असल्याचे पालिकेला सूचित केल्याचे राज्य विशेष कृती दलाचे सदस्य डॉ. राहुल पंडित यांनी सांगितले.

व्हिडीओ चित्रीकरण

व्हिडीओ यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक रुग्णावर विभागप्रमुख आणि संस्थाप्रमुख यांनी बारकाईने लक्ष ठेवावे आणि कुठेही विलंब होणार नाही, कमतरता राहणार नाही याची वेळोवेळी खात्री करावी. प्रत्येक मृत्यू प्रकरणाबाबत सविस्तर परीक्षण केले जावे आणि गरजेनुसार न्यायवैद्यकीय परीक्षणासाठी व्हिडीओ तयार ठेवावा या सूचनाही आयुक्तांनी केल्या आहेत.

वाढता मृत्यूदर चिंताजनक

मुंबईचा मृत्यूदर ३ टक्क्यांवरून ५.६६ टक्क्यांवर गेला असून देशाच्या तुलनेतही (३ टक्के) अधिक आहे. यात चेंबूरमध्ये सर्वाधिक म्हणजे १० टक्के नोंदला आहे. त्या खालोखाल वांद्रे पूर्व (८.२२), डोंगरी (८.०२) आणि वरळीचा (७.२) आहे.

कृती आराखडा असा..

’ मध्यम आणि तीव्र स्वरूपाची बाधा असलेला प्रत्येक रुग्णाची सांघिक जबाबदारी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचारी यांची असेल.

’ अशा प्रत्येक रुग्णाच्या बाबतीत वरिष्ठ आणि कनिष्ठ यांनी दिवसातून किमान दोन वेळा व्हिडीओ किंवा टेलिफोनच्या माध्यमातून संपर्कात राहणे बंधनकारक असेल.

’ अशा रुग्णाची करोना उपचारांसह संपूर्ण पूरक काळजीही घेतली गेली पाहिजे.

’ विषाणू रोधी (अ‍ॅण्टीव्हायरल), स्टिरॉइड, प्लाझ्मा यांसह औषधांचा पुरेसा साठा असल्याची खात्री करावी आणि त्यांचा योग्य उपयोग करावा.