मुंबई : धारावीतील गजबजलेल्या शाहू नगर परिसरात गेल्या आठवडय़ात झालेल्या सिलिंडर स्फोटातील आणखी चार जणांचा सोमवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या पाच झाली आहे. वायूगळती होत असलेला सिलिंडर पहिल्या मजल्यावरून खाली फेकून देण्यात आला होता. या दुर्घटनेत १७ जण जखमी झाले होते. या दुर्घटनेत आठ वर्षांच्या मुलासह पाच जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

धारावीतील शाहू नगर कमला नगर येथील मुबारक हॉटेलच्या जवळ २९ ऑगस्टच्या दुपारी साडेबारा वाजता ही दुर्घटना घडली होती. दुमजली घरातील  पहिल्या मजल्यावरील घराच्या बाहेर ठेवलेल्या सिलिंडरमधून वायूगळती सुरू झाली. त्यानंतर गॅस सिलिंडरचा स्फोट झाला. पंधरा मिनिटांत आग विझवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. मात्र हा स्फोट इतका भीषण होता की या स्फ ोटात १७ जण जखमी झाले. जखमींना शीव रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गंभीर जखमींपैकी आठ वर्षांच्या सोनू जयस्वाल या मुलाचा ३१ ऑगस्टला मृत्यू झाला. तर गेल्या आठवडय़ाभरात सितारादेवी जयस्वाल (४० वर्षे), शौकत अली (५८), अंजू गौतम (२८), प्रेम जयस्वाल (३२) या चार जणांचाही मृत्यू झाल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले आहे.

या दुर्घटनेतील अन्य १२ जखमींपैकी तीन जण अद्याप गंभीर असून पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. तर चौघांना उपचार करून सोडून देण्यात आले आहे.