मुंबईत बुधवारी १,३८१ नवीन रुग्णांची नोंद झाली, तर गेल्या ४८ तासांत ६२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. एकूण बाधितांची संख्या ८७ हजारांहून अधिक झाली असून, मृतांचा आकडा पाच हजारांवर पोहोचला आहे. ६८ टक्के रुग्ण करोनामुक्त झाले आहेत.

मुंबईमध्ये करोनाचा संसर्ग सुरू झाल्यापासून आतापर्यंत ३ लाख ६४ हजार ७५३ चाचण्या करण्यात आल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला आहे. ३ फेब्रुवारीला मुंबईत पहिली कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यानंतर गेल्या पाच महिन्यांच्या काळात तीन लाखांचा टप्पा पार करण्यात आला आहे. बुधवारी ८ जुलै रोजी एका दिवसात सुमारे ५ हजार ४८३ चाचण्या करण्यात आल्या.

अतिजोखमीच्या रुग्णांची प्रतिजन चाचणी

करोना संशयित व लक्षणे असलेल्या तसेच अति जोखमीच्या व्यक्ती ज्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे अशा व्यक्तींना प्रतिजन (अ‍ॅण्टीजन) चाचणी करता येणार आहे. ‘आयसीएमआर’ मान्यताप्राप्त प्रयोगशाळेतून ही चाचणी करता येणार आहे. त्यात केमोथेरपी घेत असलेले रुग्ण, एचआयव्ही बाधित रुग्ण, घातक आजाराचे निदान झालेले रुग्ण, प्रत्यारोपण केलेले रुग्ण, दीर्घ आजार असलेले ज्येष्ठ नागरिक, आपत्कालीन शस्त्रक्रिया केली जाणारे रुग्ण, इंडोस्कोपी, डायलिसिस अशा उपचारांपूर्वी देखील ही चाचणी करता येणार आहे.

ठाणे जिल्ह्य़ातील स्थिती..

* ठाणे जिल्ह्य़ात बुधवारी करोनामुळे ५१ जणांचा मृत्यू झाला असून, एकूण मृतांची १ हजार ४०४ वर पोहोचली आहे. दिवसभरात १ हजार ७९७ नवे रुग्ण आढळून आल्याने जिल्ह्य़ातील एकूण करोनाबाधितांची संख्या ४७ हजार ६३ इतकी झाली आहे.

* बुधवारी कल्याण-डोंबिवलीत सर्वाधिक ४७१, ठाण्यात ४१०, नवी मुंबईत २०७, मीरा-भाईंदर १७५, उल्हासनगर १७२, ठाणे ग्रामीण १०७, भिवंडीत ९५, बदलापूरात ८५ आणि अंबरनाथमध़्े ७५ रुग्ण आढळले.

* ठाणे शहरात १७, नवी मुंबई ९, कल्याण शहर ७, भिवंडी ६, अंबरनाथ ४, मीरा-भाईंदर ४, ठाणे ग्रमीण ३ आणि बदलापूरात एका रुग्णाचा बुधवारी मृत्यू झाला.