पुणे, नागपूर, औरंगाबाद आणि मुंबईत सर्वाधिक रुग्ण

शैलजा तिवले, लोकसत्ता

मुंबई:  राज्यात करोनाची लाट ओसरत आली तरी म्युकरचा प्रादुर्भाव मात्र वाढताना दिसत आहे. गेल्या महिनाभरात म्युकरमायकोसिसच्या रुग्णांची संख्या सुमारे ८० टक्कय़ांनी वाढली असून मृतांच्या संख्येतही सुमारे ८३ टक्कय़ांनी वाढ झाली आहे. सर्वाधिक रुग्ण नागपूर, पुणे, औरंगाबाद आणि मुंबई येथे आहेत.

मेच्या पहिल्या आठवडय़ापासून म्युकरच्या रुग्णांची नोंद करण्यास सुरुवात झाली. मेच्या पहिल्या १५ दिवसांमध्ये म्युकरचे १४८७ रुग्ण होते तर मृत्यूची संख्या १०७ होती. परंतु जून मध्यापर्यंत रुग्णसंख्येचा आलेख जवळपास सातपटीने वाढला आहे. सध्या राज्यात ७३९५ रुग्ण असून ६४४ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात म्युकरचा मृत्युदर सुमारे नऊ टक्के आहे.

राज्यात म्युकरचे सर्वाधिक रुग्ण पुणे (१२१५) आणि नागपूर (११८४)मध्ये आहेत. एकूण रुग्णसंख्येपैकी सुमारे ३२ टक्के रुग्ण या दोन जिल्ह्य़ांमध्ये आहेत. नागपूरमध्ये महिनाभरात रुग्णसंख्या सुमारे पाच पटीने वाढली असून मृतांची संख्या सात वरून १०१ वर गेली आहे. पुण्यातही साधारण हीच स्थिती आहे. पुण्यामध्ये महिनाभरात रुग्णांची संख्या सुमारे चार पटीने वाढली असून मृतांची संख्या २० वरून ८५ वर गेली आहे.

बाहेरून रुग्ण उपचारासाठी

अ‍ॅम्फोटेरेसिन बी या इंजेक्शनचा तुटवडा आणि वाढलेल्या भरमसाट किमती यामुळे जिथे इंजेक्शन मोफत उपलब्ध असेल अशा ठिकाणी रुग्ण मोठय़ा प्रमाणात उपचारासाठी जात आहेत. या जिल्ह्य़ांमधील रुग्णांपेक्षा जवळच्या जिल्ह्य़ांमधून उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे येथे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येते, असे कृतिदलाचे सदस्य आणि कान, नाक, घसातज्ज्ञ डॉ.अशेष भूमकर यांनी सांगितले.

पुढील दोन ते तीन आठवडय़ांत रुग्णसंख्या कमी होण्याची शक्यता 

करोनाबाधितांमध्ये साखरेची पातळी नियंत्रणात नसलेल्या रुग्णांमध्ये तीन ते सहा आठवडय़ांपर्यंत म्युकरमायकोसिसची बाधा होण्याची शक्यता अधिक आहे. म्युकरचे रुग्ण वाढल्यानंतर तातडीने या रुग्णांमधील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यावर अधिक भर दिला गेला आहे.

त्यामुळे या आधीचे जे रुग्ण होते त्यांना बाधा झाली असली तरी त्यानंतरच्या रुग्णांमध्ये विशेष काळजी घेतल्याने बाधा होण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे म्युकरची ही लाट पुढील दोन ते तीन आठवडय़ात कमी होईल, असे मत डॉ. भूमकर यांनी व्यक्त केले.

३० टक्के रुग्ण बरे

राज्यात बाधित झालेल्या ७३९५ रुग्णांपैकी २२१२ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत, तर ४४६३ रुग्ण सध्या उपचार घेत आहेत. ७६ रुग्ण सरकारी रुग्णालयांमधून उपचार न घेताच स्वत:च्या जोखमीवर बाहेर पडले आहेत. हे रुग्ण अन्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले असण्याची शक्यता आहे.

सर्वाधिक रुग्णसंख्या असलेले जिल्हे

               रुग्णसंख्या      मृत्यू

पुणे             १२१५            ८५

नागपूर        ११८४            १०१

औरंगाबाद      ७००            ५१

मुंबई(शहर)     ४३७            ४०

उपनगर         १५९            १८

नाशिक          ५४२           ५७

सोलापूर        ४२३           ३६

ठाणे            २४५            ३२

सांगली        २३९             १४