शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनापर्यंत शिवसेनेच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापनेबाबत ठोस निर्णय होण्याची अपेक्षा असताना काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप चर्चाचे गुऱ्हाळ सुरू आहे.

संसदेत भाजपने शिवसेनेला विरोधी बाकांवर बसविण्याचा निर्णय घेतल्याने सेनेचे खासदार  आक्रमक होणार आहेत. अवेळी पावसाने नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना अधिक भरपाई मिळावी, यासाठी संसदेत गदारोळ होण्याची चिन्हे आहेत.

शिवसेनेबरोबर सरकार स्थापनेचे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रयत्न सुरू असले तरी उभय पक्षांमध्ये अजूनही मतमतांतरे आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांविरुद्ध अंमलबजावणी संचालनालय (ईडी), लाचलुचपत प्रतिबंधक विभाग व अन्य यंत्रणांच्या चौकशा प्रलंबित आहेत. शिवसेना हिंदुत्वाच्या मुद्दय़ावर आक्रमक आहे. त्यामुळे उभय पक्षांमधील काही नेते शिवसेनेबरोबर जाऊ नयेत, या मताचे आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधील काही नेत्यांना केंद्रातील सत्ताधारी भाजपबरोबर गेल्यास अधिक लाभ मिळू शकतो, असे वाटत आहे. या पाश्र्वभूमीवर चर्चाचे गुऱ्हाळ सुरू आहे.

शिवसेना नेते अरविंद सावंत यांनी केंद्रीय मंत्री पदाचा राजीनामा दिल्याचा अर्थ शिवसेना रालोआतून बाहेर पडली, असा काढून भाजपने शिवसेनेच्या खासदारांची संसदेत बसण्याची व्यवस्था विरोधी बाकांवर केली आहे. त्यामुळे शिवसेना नेते संतप्त झाले आहेत. यासंदर्भात विचारता बसण्याच्या व्यवस्थेबाबत आम्हाला सोमवारी माहिती मिळेल, असे खासदार विनायक राऊत यांनी सांगितले.

शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठीशी असून अवेळी पावसाने त्यांना किमान २५ हजार रुपये प्रति हेक्टर मदत देण्याची शिवसेनेची मागणी आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात केलेल्या दौऱ्यांच्या वेळी ही भूमिका मांडली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अधिक मदत मिळाली पाहिजे,अशी शिवसेनेची मागणी असून विविध माध्यमांमधून संसदेत ती आक्रमकपणे मांडली जाईल, असे राऊत यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

राज्यात राष्ट्रपती राजवट असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक मदतीसाठी निधीची तरतूद करण्याचा प्रस्ताव संसदेत मंजुरीसाठी पाठविला जाण्याची शक्यता आहे. शिवसेना अर्थसाहाय्य वाढवून देण्यासाठी आक्रमक राहणार आहे.