ठाणे स्थानक परिसरात उभारण्यात येणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याच्या अनावरणावरून झालेल्या वादातून रिपाइंचे नगरसेवक रामभाऊ तायडे आणि महापालिका मुख्यालय उपायुक्त संदीप माळवी यांच्यात शिवीगाळ व धक्काबुक्की झाल्याचा प्रकार सोमवारी महापौरांच्या कार्यालयात घडल्याने महापालिकेत एकच खळबळ उडाली.
तायडे यांनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यासाठी महापालिका आयुक्तांकडे लेखी परवानगी मागितल्याचे संदीप माळवी यांनी सांगितले. तसेच माळवी यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावत  माळवींनीच आपल्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप रामभाऊ  तायडे यांनी केला आहे.
ठाणे स्थानक परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात येणार असून त्याचे येत्या ९ जून रोजी अनावरण करण्यात येणार आहे. या पुतळ्याच्या अनावरणाचा दोनदा मुहूर्त टळल्याने आंबेडकरी जनतेमध्ये संतापाची लाट होती. त्यामुळे येत्या ९ जून रोजी या पुतळ्याच्या अनावरणाचा तिसरा मुहूर्त ठरला तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक ठरले. त्यानुसार, महापालिका प्रशासनाने कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचे काम सुरू केले आहे.
या विषयी चर्चा करण्यासाठी सोमवारी दुपारी संदीप माळवी यांना महापौर कार्यालयात बोलाविण्यात आले. मात्र, त्या ठिकाणी महापौर नव्हते. त्यावेळी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याचे अनावरण कुणी करायचे, यावरून तेथे उपस्थित असलेले रिपाइंचे नगरसेवक रामभाऊ तायडे आणि माळवी यांच्यात हमरीतुमरी झाली. हे पाहून लगेच महापौर कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी मध्यस्थी करीत या दोघांमधील भांडण मिटविले, अशी माहिती महापालिका सूत्रांनी दिली.