शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसंदर्भात १५ जूनपर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असली तरी, ‘कर्जमाफी दिल्यास शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबतील, याची हमी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार देणार आहेत का, असा सवाल कृषी व महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केला आहे. कर्जमाफीचा प्रयोग त्यांनीही करून पाहिला, पण शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या नाहीत, असे खडसे म्हणाले. 

पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली असता, राज्य सरकारने शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या मदतीविषयीची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. शेतकऱ्यांना जुन्या कर्जाचे व्याज भरावे लागणार नाही. शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठन, जलयुक्त शिवार योजना आदी उपायांबरोबरच, शेतकऱ्यांना दुधाचे दर वाढवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

शेतकऱ्यांना २०० कोटींची मदत
गारपिटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्य सरकारने २०० कोटी रुपयांची मदत विशेष बाब म्हणून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे कोकणातील आंबा, काजू लागवड केलेल्या शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे. त्यांना सुमारे ६० कोटी ८५ लाख रुपयांची मदत मिळणार आहे. कोकणातील शेतकऱ्यांना मदत दिली न गेल्याने त्यांच्यावर अन्याय झाल्याची तक्रार होती. पण आता सरकारने २०० कोटी रुपयांचा निधी त्यासाठी दिला आहे. याशिवाय रब्बी हंगामात पिकांचे व फळबागांचे नुकसान झालेल्या नाशिक, पुणे, औरंगाबाद व नागपूर महसुली विभागातील शेतकऱ्यांना सुमारे ३६४ कोटी २८ लाख रुपये निधीचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती खडसे यांनी दिली.