किती कोटींचे कर्ज यावर राज्यावरील कर्जाचे मूल्यमापन यावर होत नाही, तर राज्याच्या उत्पन्नाच्या प्रमाणात किती टक्के कर आहे यावर ठरते. महाराष्ट्रावरील कर्ज हे त्या हिशेबाने मर्यादेत असून राज्य कर्जबाजारी असल्याचा आरोप हा निराधार व महाराष्ट्राचा अवमान करणारा असल्याचे उत्तर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंगळवारी विधानसभेत दिले. राज्याच्या विकास योजनेचे आकारमान ९९ हजार कोटी रुपये असून सर्व पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत महिनाभरात निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी जाहीर केले.

विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला त्यांनी उत्तर दिले.  राज्याच्या सध्याच्या आर्थिक परिस्थितीचे चित्र सांगत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केलेल्या टीकेला मुनगंटीवार यांनी उत्तर दिले. पृथ्वीराज चव्हाण यांनी अर्थसंकल्पातील उद्दिष्टांबाबत प्रश्न उपस्थित केले, काही सूचना केल्या. त्या आम्ही वडीलधाऱ्यांच्या भावना म्हणून स्वीकारतो. मात्र, नऊ वर्षे अर्थमंत्री राहूनही राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी चुकीचे आकडे व निराधार आरोप केल्याची टीका मुनगंटीवार यांनी केली. एक लाख कोटी डॉलर अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट राज्य सरकार निश्चित साध्य करेल. त्यासाठी शिस्तबद्ध प्रयत्न केले जातील.

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारच्या काळात कर्जाचे प्रमाण एकूण उत्पन्नाच्या २८.२ टक्क्यांपर्यंत पोहोचले होते. आम्ही ते प्रमाण १५ टक्क्यांपर्यंत खाली आणले आहे. वित्तीय शिस्तीच्या मर्यादेत आणले आहे.

राज्याचे वस्तू व सेवा कराचे उत्पन्न १ लाख २८ हजार ८९५ कोटी रुपयांवर गेल्याचेही त्यांनी नमूद केले. राज्यातील थेट परकीय गुंतवणुकीचे प्रमाण गेल्या चार वर्षांत ३ लाख ५१ हजार कोटी रुपयांवर गेले आहे. गेल्या दहा महिन्यांत राज्यात २० लाख रोजगार वाढला, अशी आकडेवारीही मुनगंटीवार यांनी दिली.

 महाभरतीचे आश्वासन पोकळ -मुंडे

दोन वर्षांमध्ये दीड लाख पदे भरण्याची घोषणा करून सरकार बेरोजगारांची फसवणूक करीत असल्याची टीका विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी  केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीची घोषणा केली होती, मात्र पाच वर्षे पूर्ण होत आली तरी त्यासाठी ‘मुख्यमंत्र्यांची योग्य वेळ’ अद्याप आली नसल्याचा टोला मुंडे यांनी विधान परिषदेत लगावला.

‘गोडसे खलनायकच, जन्म बारामतीचा’

* अर्थसंकल्पात महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीसाठी निधी ठेवल्यावरून जयंत पाटील यांनी नथुराम गोडसेवर चर्चा नेली. गांधीजी हे राष्ट्रपिता होते. कोणा एका पक्षाचे ते नाहीत. नथुराम गोडसे हा तर नेहमीच खलनायक राहिला. दुर्दैवाने त्याचा जन्म बारामतीला झाला होता, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला.

* काँग्रेस-राष्ट्रवादीला आता २५ वर्षे विरोधात राहायचे आहे. ज्यांना इतके दिवस थांबायचे नाही त्यांच्यासाठीही मार्ग उपलब्ध आहे. आता विखे-पाटील नेमके सभागृहात नाहीत, असे विधान मुनगंटीवार यांनी करताच सभागृहात हशा उसळला.