मानखुर्द येथील ‘नवजीवन’ वसतिगृहातून महिला पळाल्याची घटना ताजी असतानाच याच परिसरातील गतिमंद आश्रमशाळेतूनही दोन मुलांनी पलायन केल्याची बाब बुधवारी उच्च न्यायालयात उघडकीस आली. न्यायालयाने या प्रकाराची गंभीर दखल घेत या मुलांना शोधून काढण्याचे आदेश ट्रॉम्बे पोलिसांना दिले आहेत. तसेच असे प्रकार रोखण्यासाठी आश्रमशाळेभोवती कुंपण भिंत बांधण्याचे निर्देशही न्यायालयाने सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहेत.
पनवेल येथील ‘कावदास’ गतिमंद मुलांच्या आश्रमशाळेतील मुलांचा शारीरिक, लैंगिक आणि मानसिक छळ केला जातो. त्यांना निकृष्ट दर्जाचे जेवण देण्यात येते, असा आरोप करणारे आणि आश्रमशाळेतील दयनीय स्थितीबाबतचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर त्याची स्वत:हून दखल घेत न्यायालयाने जनहित याचिका दाखल करून घेतली होती. न्यायालयाने राज्यभरातील आश्रमशाळांवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच या विशिष्ट आश्रमशाळेबाबत केलेल्या आरोपांच्या चौकशीसाठी डॉ. आशा वाजपेयी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली होती. ही समिती वेळोवेळी आश्रमशाळांतील स्थितीविषयी न्यायालयात अहवाल सादर करीत असते. न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड आणि न्यायमूर्ती अमजद सय्यद यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर बुधवारी सुनावणी झाली. त्या वेळी या समितीने सादर केलेल्या अहवालातून मानखुर्द येथील गतिमंद आश्रमशाळेतून दोन मुलांनी पलायन केल्याची बाब उघडकीस आली.
अनुक्रमे १२ व १४ वर्षांची ही मुले ६ जुलै तसेच ११ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहेत. समितीच्या अहवालाद्वारे ही माहिती उघड झाल्यानंतर न्यायालायने त्याची गंभीर दखल घेत पोलिसांकडे त्याबाबत विचारणा केली. त्यावर त्यांना शोधण्याचे अथक प्रयत्न करण्यात आले. परंतु त्याला यश आले नाही, असे पोलिसांतर्फे सांगण्यात आले. मात्र या मुलांना शोधण्यासाठी लवकरात लवकर आवश्यक ती पावले उचलून त्यांना शोधून काढावे, असे आदेश न्यायालयाने दिले.