लवकरच १७ ऐवजी २४ डब्यांची सुविधा

मुंबई : मुंबई आणि पुणे या दोन शहरांना जोडणारी प्रवाशांची लाडकी ‘डेक्कन क्वीन’ (दख्खन राणी) शनिवार, १ जूनला आपल्या सुप्रतिष्ठित सेवेची ८९ वर्षे पूर्ण करून नव्वदाव्या वर्षांत पदार्पण करीत आहे. तत्कालीन ग्रेट इंडियन पेनुनसुला रेल्वेने (जीआयपी) १ जून १९३० ला ही सेवा सुरू केली होती. दोन प्रमुख शहरांना जोडणारी मध्य रेल्वेची ही पहिलीच ‘डिलक्स’ सेवा आहे.

प्रवाशांना आरामदायी प्रवासाचा अनुभव देणाऱ्या या गाडीला देशात सर्वात प्रथम रोलर बेयिरग असलेले डबे जोडण्यात आले होते. या गाडीला लवकरच ‘एलएचबी’ डबे लावण्यात येणार असून ‘पुशपुल’ तंत्राने वेग वाढवण्याची मध्य रेल्वेची योजना आहे. पुशपुल तंत्रासाठी डायनिंग कारदेखील एलएचबी तंत्राप्रमाणे तयार करावी लागेल. डेक्कन क्वीनच्या प्रवाशांच्या मनात ठसलेला पांढरा आणि निळा रंग व लाल पट्टी हे रूप कायम ठेवून अत्याधुनिक एलएचबी तंत्राचे डबे तयार करण्यात येतील. लवकरच ही गाडी १७ डब्यांऐवजी २४ डब्यांची करण्यात येईल. एक्झिक्युटिव्ह श्रेणीसाठी विमानप्रवासाप्रमाणे आसने असणारा ‘अनुभूती’ कोच जोडण्याचाही रेल्वेचा विचार आहे.

सध्या डेक्कन क्वीन ही चार वातानुकूलित डब्यांसह एकूण १७ डब्यांची असून एकूण १,४१७ आसनांची सुविधा उपलब्ध आहे. ३२ प्रवाशांसाठी धावते उपाहारगृह (डायनिंग कार) सुविधादेखील दिलेली आहे. महाराजा एक्सप्रेस, डेक्कन ओडीसी, पॅलेस ऑन व्हील या महागडय़ा गाडय़ांशिवाय डायनिंग कारची सुविधा असलेली ही एकमेव गाडी आहे.