माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनी, दि. १५ ऑक्टोबर रोजी संपूर्ण राज्यात साजऱ्या केल्या जाणाऱ्या वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून रेल्वे गाडय़ांमध्ये ‘लायब्ररी ऑन व्हील्स’- फिरते ग्रंथालय – सुरू करण्यात येत असून, येत्या १५ ऑक्टोबरपासून डेक्कन क्वीन व पंचवटी एक्स्प्रेस या दोन गाडय़ांमध्ये रेल्वेच्या सहकार्याने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. या गाडय़ांतील प्रवाशांना आता प्रवासातच वाचनाचा आनंद मिळेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी दिली.

मध्य रेल्वेच्या डेक्कन क्वीन (पुणे- मुंबई- पुणे) आणि पंचवटी एक्स्प्रेस (मनमाड- मुंबई- मनमाड) या दोन गाडय़ांमधील फिरत्या ग्रंथालयाचे सोमवारी उद्घाटन होणार आहे. या दोन्ही रेल्वे गाडय़ांमधील मासिक पासधारकांसाठी आरक्षित असलेल्या डब्यांमध्ये मराठी भाषा विभागाच्या राज्य मराठी विकास संस्थेने नेमलेले वाचनदूत प्रवाशांना विनाशुल्क वाचनसेवा देण्यास सुरुवात करणार आहेत. या उपक्रमास प्रतिसाद द्यावा, असे आवाहन तावडे यांनी प्रवाशांना केले आहे.

भिलार येथे आज कार्यक्रम

पुस्तकांच्या गावी सातारा जिल्ह्य़ातील भिलार येथेही ‘वाचनध्यास’ या सलग वाचनाच्या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन प्रेरणा दिनाच्या पाश्र्वभूमीवर शनिवार, दि. १३ व रविवार, दि. १४ ऑक्टोबर या दोन दिवसांत ७५ वाचक, आपल्या आवडत्या पुस्तक-घरात एकूण १२ तास पुस्तक-वाचन करणार आहेत. भिलार येथेच ‘पाऊसवेळा’ हा साहित्यिक-सांगीतिक कार्यक्रमही दि. १४ रोजी सायंकाळी ५.०० वाजता योजण्यात आला आहे.

ग्रंथालयांमध्ये वाचनध्यास उपक्रम

वाचन प्रेरणा दिनानिमित्त राज्य मराठी विकास संस्थेच्या सहकार्याने आणि ग्रंथालय संचालनालयाच्या माध्यमातून राज्यातील ‘अ’ वर्गाच्या एकूण ३३४ ग्रंथालयांमध्ये ‘वाचनध्यास’ या उपक्रमाचे सोमवारी आयोजन करण्यात येत आहे.

या ग्रंथालयांमधील वाचक व सभासद सलग काही तास वाचनाचा आनंद घेणार आहेत.  काही ग्रंथालयांतून, डॉ. गो. ब. देगलूरकर, डॉ. अरुणा ढेरे, डॉ. गो. मा. पवार, कवी दासू वैद्य, श्रीमती नीलिमा बोरवणकर, श्याम भुरके, डॉ. विनय काळीकर, श्रीमती रझिया सुलताना, अमृत देशमुख, वैभव जोशी, लक्ष्मीकांत धोंड असे मान्यवर साहित्यिक तसेच ज्येष्ठ दिग्दर्शक प्रमोद पवार हे वाचकांशी संवाद साधणार आहेत, असे विनोद तावडे यांनी सांगितले.

महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाच्या वतीने येत्या १५ ऑक्टोबर रोजी सायं. ५.०० वा. ‘मला उमगलेले राम गणेश गडकरी, गदिमा व पु.ल. देशपांडे’ हा विशेष कार्यक्रम प्रभादेवीच्या रवींद्र नाटय़ मंदिरात आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळातर्फे वाई व सातारा परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये ‘विश्वकोश कसा वाचावा’ या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले आहे. मंत्रालयातील सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी ‘वाचनतास’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले असून १५ ऑक्टोबर रोजी सकाळी साडेदहा ते सायंकाळी साडेपाच या वेळेत प्रत्येकाने किमान एक तास त्रिमूर्ती प्रांगण, मंत्रालय येथे जाऊन आवडेल ते पुस्तक घेऊन वाचावे, असे आवाहन तावडे यांनी केले.