गाडीच्या दोन्ही बाजूला इंजिन जोडण्याची योजना

मुंबई : मुंबई-पुणेदरम्यान धावणाऱ्या ‘डेक्कन क्वीन’चा वेग आणखी वाढणार आहे.  ‘पुश अ‍ॅण्ड पुल’ तंत्रज्ञानानुसार या गाडीच्या पुढे व मागे इंजिन जोडण्याची योजना आहे. दोन दिवसांपूर्वीच या यंत्रणेची चाचणी यशस्वी झाल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास वेळ वाचणार आहे.

मुंबई ते पुणे मार्गावर धावणाऱ्या डेक्कन क्वीनचाही वेग वाढवण्याची मागणी होत होती. परंतु त्या दरम्यान असलेल्या घाट क्षेत्रामुळे वेग कसा वाढेल, असा प्रश्न होता. त्यामुळे या गाडीला राजधानी एक्स्प्रेसप्रमाणेच पुश अ‍ॅण्ड पुल यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय घेतला.

या यंत्रणेची चाचणी दोन दिवसांपूर्वीच मुंबई ते पुणे मार्गावर घेण्यात आली. ही चाचणी यशस्वी झाली आहे.

सध्या डेक्कन क्वीनला मुंबई ते पुणे प्रवासासाठी ३ तास १५ मिनिटे लागतात. पुश अ‍ॅण्ड पुल यंत्रणेमुळे हाच प्रवास वेळ २ तास ३५ मिनिटांवर येणार असल्याचे मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुनील उदासी यांनी सांगितले.

राखीव राजधानी गाडीने चाचणी

डेक्कन क्वीन गाडीचे डबे एलएचबी प्रकारातील नाहीत. दोन्ही बाजूला इंजिन असलेल्या पुश अ‍ॅण्ड पूल यंत्रणा ही सध्याच्या लांब पल्ल्याच्या गाडय़ांना बसू शकत नाही. त्यासाठी एलएचबी या नव्या प्रकारातील डबे आवश्यक असतात. त्यामुळे मुंबई ते दिल्ली मार्गावर धावणाऱ्या एलएचबी डब्यांच्या राजधानी एक्स्प्रेसची एक राखीव रिकामी गाडी घेऊन त्याची चाचणी मुंबई ते पुणे मार्गावर घेण्यात आली.