देशभरात आता करोनाच्या रुग्णांबरोबरच म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचीदेखील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिसच्या उपचारांसाठी वापरण्यात येणाऱ्या ‘अ‍ॅम्फोटेरसीन-बी’ या इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेमडेसिविरप्रमाणेच या औषधांची काळ्याबाजारात विक्री होत असून अनेक जण आपल्या रुग्णांच्या उपचारांसाठी हवी ती किंमत देऊन हे इंजेक्शन खरेदी करत आहे. मात्र अशा परिस्थितही काही जणांकडून फसवणूक करण्यात येत आहे. असाच प्रकार मुंबईमध्ये घडला आहे.

बोरीवली येथील एम.एच.बी.कॉलनी पोलिसांनी एका २७ वर्षीय व्यक्तीला म्युकरमायकोसिसवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या औषधे देण्याच्या बहाण्याने लाखो रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपाखाली अटक केली आहे. आरोपीने बोरीवली पश्चिम येथे राहणाऱ्या व्यक्तीची १.८० लाख रुपयांची फसवणूक केली आणि तो पैसा त्याने लग्न करण्यासाठी वापरला अशी तक्रार दिली होती.

‘म्युकरमायकोसिस’वरील औषधाच्या अपुऱ्या पुरवठ्यावर न्यायालयाचा संताप

६,००० रुपयांना एका डोसची विक्री

तक्रारदाराला इंदूरच्या डीएनएस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात नातेवाईकासाठी काळ्या बुरशीवर वापरल्या जाणाऱ्या ‘अ‍ॅम्फोटेरसीन-बी’ इंजेक्शनची नितांत गरज होती. तक्रारदाराने २३ मे रोजी औषधांच्या दुकानात काम करणाऱ्या एका मित्राला यासंदर्भात माहिती दिली. तेव्हा त्याने आरोपीचा नंबर तक्रारदाराला दिला. त्यावेळी तक्रारदाराने आरोपीसोबत संपर्क साधत इंजेक्शनची मागणी केली. आरोपीने आपण व्यवस्था करु शकतो पण प्रत्येक डोससाठी ६,००० रुपये द्यावे लागतील असे सांगितले.

“डॉक्टरांनी मला इंजेक्शनचे ६० डोस घेण्यास सांगितले होते, म्हणून मी ते आरोपीकडे मागितले. त्याने मला एकूण रक्कमेच्या अर्धी रक्कम म्हणजे १.८० लाख रुपये देण्यास सांगितले. नातेवाईकाची तब्येत जास्त खराब होत असल्याने तातडीने इंजेक्शनची आवश्यकता होती, म्हणून मी त्यासाठी पैसे देण्याचे मान्य केले. त्यानंतर आरोपीने त्याचा अकाऊटं नंबर देऊन पैसे पाठवण्यास सांगितले. मी स्वत: च्या खिशातून ५०,००० रुपये दिले आणि बाकीचे मित्रांकडून कर्ज घेतले आणि आरोपीला २५ मे रोजी पाठवले असे तक्रारदाराने सांगितले.

म्युकरमायकोसिस रुग्णांच्या नातेवाईकांपुढे संकट

पैसे मिळाल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे

२७ तारखेला इंजेक्शन पाठवेल असे आरोपीने सांगितले होते. पण जेव्हा तक्रारदाराने त्याला फोन केला तेव्हा सुरुवातीला त्याने काहीच उत्तर दिलं नाही आणि जेव्हा त्याने औषध पाठवलं नाही तेव्हा काहीतरी कारणे दिली. तक्रारदाराला फसवणूक झाल्याचे कळताच आरोपील पैसे परत करण्यास सांगितले. तेव्हा त्याने मला पैसे देण्यास नकार दिला.

त्यानंतर तक्रारदाराने आपल्या मित्रासह आरोपीला १ जूनला मालाड पूर्वेच्या साईधाम मंदिरात फोन करुन बोलावले. त्यानंतर दिंडोशी पोलीस ठाण्यात नेले. चौकशीनंतर पोलिसांना आढळले की ही घटना एमएचबी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे त्यामुळे पोलिसांना आरोपीला त्यांच्याकडे सोपवले.

हे ही वाचा >> “आपल्यातही असे राक्षस आहेत”; पोस्ट शेअर करत आर माधवनने नेटकऱ्यांना केलं सावध

आधी ही याप्रकारे फसवणूक केल्याची माहिती समोर

पोलिसांना ४०६ आणि ४२० या कलमांखाली आरोपीला अटक केली आहे. आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. याआधी देखील आरोपीने तीन जणांची अशीच फसवणूक केली आहे अशी माहिती समोर आली आहे. तक्रारदाराने ज्या दिवशी पैसे पाठवले होते त्याचा वापर करुन आरोपीने लग्न केल्याची माहिती दिली आहे.