News Flash

अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचे धोरण शिथिल

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर या संदर्भातील कामांसाठी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते.

(संग्रहित छायाचित्र)

करोनाकाळापुरता महापालिका प्रशासनाचा निर्णय

मुंबई : कर्तव्य बजावताना करोनाची बाधा होऊन मृत्युमुखी पडणाऱ्या पालिकेच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांपैकी एकाला पालिकेच्या सेवेत सामावून घेता यावे यासाठी प्रशासनाने अनुकंपा तत्त्वावरील नोकरीचे धोरण शिथिल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव प्रशासनाने स्थायी समितीला सादर केला आहे.

मुंबई महापालिकेने राज्य सरकारच्या धर्तीवर अनुकंपा तत्त्वावरील नोकरी देण्याबाबतचे धोरण स्वीकारले आहे. त्यानुसार ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील कर्मचारी सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्याच्या वारसाला अनुकंपा तत्त्वावर नोकरी अनुज्ञेय नाही. ‘क’ आणि ‘ड’ संवर्गातील कर्मचाऱ्याचा सेवेत असताना मृत्यू झाल्यास अटीसापेक्ष पात्र उमेदवाराला या धोरणानुसार नोकरी दिली जाते.

मुंबईत करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर या संदर्भातील कामांसाठी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांना तैनात करण्यात आले होते. सेवेत असताना काही कर्मचाऱ्यांना करोनाची बाधा झाली. तसेच १८७ जणांचा करोनाची बाधा होऊन मृत्यूही झाला. यामध्ये अधिकारी आणि विविध श्रेणींतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. करोनाविषयक काम करताना मृत्यू झालेल्या आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांच्या वारसांना केंद्र सरकारतर्फे ५० लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येते. कर्तव्यावर असताना करोनाची बाधा होऊन मृत्यू झालेल्या आरोग्य खाते वगळून अन्य खात्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वारसांना पालिकेकडून ५० लाख रुपये नुकसानभरपाई आणि पात्र वारसाला पालिकेच्या  सेवेत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र अनुकंपा तत्त्वावरील धोरणातील अटींमुळे ते शक्य होत नव्हते. परिणामी करोनाकाळासाठी हे धोरण शिथिल करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्याबाबतचा प्रस्ताव स्थायी समितीला सादर करण्यात आला असून येत्या बुधवारी या प्रस्तावावर निर्णय अपेक्षित आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2021 1:36 am

Web Title: decision of municipal administration for corna virus infection akp 94
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पुरुषोत्तम बेर्डे यांना ‘साहित्य साधना पुरस्कार’
2 सवलतीच्या दरात रंगमंच उपलब्ध करून द्या!
3 ‘पुन्हा एकदा प्लेझर बॉक्स’
Just Now!
X