गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या सीबीआय चौकशीच्या मागणीसाठी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या फौजदारी जनहित याचिकेवर उच्च न्यायालय सोमवार, ५ एप्रिलला निर्णय देणार आहे.

दिवसभराच्या सुनावणीनंतर मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्या. गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठाने परमबीर यांनी केलेल्या याचिकेसह अन्य याचिकांवरील निर्णय बुधवारी राखून ठेवला होता. पोलिसांच्या नियुक्ती, बदल्यांसाठी देशमुख पैशांची मागणी करतात, तपासकार्यात वारंवार हस्तक्षेप करतात, असे आरोप परमबीर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात केले होते. त्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात फौजदारी याचिका करून देशमुख यांच्यावरील आरोपांच्या सीबीआय चौकशीचे आदेश द्यावेत, अशी मागणी केली. सुनावणीच्या वेळी न्यायालयाने परमबीर यांना बदली होईपर्यंत देशमुख यांच्याकडून होणाऱ्या चुकीच्या गोष्टींकडे दुर्लक्ष करण्यावरून फटकारले होते.