सत्र न्यायालय

रवींद्र पाटील ‘नि:पक्षपाती साक्षीदार’
सलमानचा अंगरक्षक आणि खटल्यातील मुख्य साक्षीदार दिवंगत रवींद्र पाटील याची साक्ष ही नि:पक्षपाती असल्याचे नमूद करत अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. डब्ल्यू. देशपांडे यांनी त्याची साक्ष ग्राह्य़ धरली होती. सलमानने मद्यपान केले होते वा तो मद्यपान करून गाडी चालवत होता हे पाटील याने अपघातानंतर लगेचच दिलेल्या तक्रारीमध्ये नमूद केले नव्हते. परंतु महानगर दंडाधिकाऱ्यांसमोरील साक्षीदरम्यान त्याने ही बाब सांगितली. त्यामुळेच त्याची साक्ष ही नि:पक्षपाती आहे.

’ सलमानने मद्यपान केले होते
विनापरवाना गाडी चालवता येत नाही आणि मद्यपान करून गाडी चालवू नये याची सलमानला चांगलीच जाणीव होती. अटकेनंतर करण्यात आलेल्या वैद्यकीय चाचणीत त्याच्या रक्तात ०.०६२ टक्के मद्याचे प्रमाण आढळले. जेव्हा एखादी व्यक्ती मद्यपान करून रात्रीच्या वेळेस गाडी चालवत असेल, तर तिला त्यावर लक्ष केंद्रित करणे कठीण असते. त्यामुळे अशा अवस्थेत गाडी चालवली, तर अपघात होऊ शकतो, याची त्याला जाणीव होती.

’सलमाननेच अपघात केला
सलमानने आरोपी म्हणून जबाब नोंदवताना अपघात आपल्या नव्हे, तर चालक अशोक सिंह याच्या हातून घडल्याचा दावा केला होता. सलमानचा हा दावा न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावला. सलमानने गुन्हा केला नव्हता, तर अपघात घडला त्या वेळेस त्याने घटनास्थळी जमलेल्या जमावाला चालकाविरुद्ध कारवाई करू, असे का आश्वासित केले नाही. त्याने पोलीस ठाण्यात जाऊन अपघाताची तक्रार का नोंदवली नाही. एवढेच नव्हे, तर त्याने रुग्णालयात जाऊन जखमींची भेट घेतल्याची वा त्यांना मदत केल्याचे अथवा पोलिसांसोबत पुन्हा घटनास्थळी गेल्याचा कुठलाही पुरावा नाही. उलट तो पळून गेला आणि घरात लपून बसला. यावरून त्यानेच अपघात केल्याचे स्पष्ट होते.

’ अशोक सिंगची साक्ष अविश्वसनीय
अपघातानंतर अशोक सिंग पुढे का आला नाही. परंतु केवळ खान कुटुंबीयांचा विश्वासू म्हणून तो आपल्या हातून अपघात केल्याचे सांगत आहे. त्यामुळे त्याची साक्ष ग्राह्य़ धरता येणार नाही.

’ नुरुल्लाचा मृत्यू गाडीखाली चिरडूनच
नुरुल्ला याचा मृत्यू गाडीखाली चिरडून नाही, तर गाडी क्रेनद्वारे उचलली जात असताना पुन्हा जमिनीवर आदळली आणि त्याखाली तो सापडल्याने झाला, हा सलमानचा दावा सपशेल खोटा आहे. शवविच्छेदन अहवालातून त्याचा मृत्यू चिरडल्याने झाल्याचे स्पष्ट आहे. शिवाय साक्षीदारांनी तशी साक्षही दिलेली आहे.

’ गाडीचा टायर अपघातामुळेच फुटला
गाडीचा टायर फुटला आणि अपघात झाला हा सलमानचा दावा खोटा आहे.
तर अपघातामुळेच तो फुटला. पंचनामा तसेच त्याबाबतचा आरटीओ अधिकाऱ्याच्या अहवालाद्वारे हे स्पष्ट होते.

उच्च न्यायालय
’ रवींद्र पाटीलची साक्ष अविश्वसनीय
सलमानचा अंगरक्षक रवींद्र पाटील याने सतत आपले जबाब बदलले. अपघाताची तक्रार नोंदवताना त्याने सलमानने मद्यपान केले होते व तोच गाडी चालवत होता हे सांगितले नव्हते. नंतर त्याने ही बाब सांगितली. महानगर दंडाधिकाऱ्यांपुढे सरतपासणी व उलटतपासणीदरम्यानही त्याने सतत आपला जबाब बदलला. खुद्द सरकारी पक्षच तो बेभरवशी साक्षीदार आहे, असे म्हणत होती. त्यामुळे त्याला विश्वसनीय साक्षीदार म्हणता येणार नाही. शिवाय सत्र न्यायालयासमोरील खटल्यात सलमानवरील आरोपाचे स्वरूप वेगळे होते. त्यामुळे तेथे दरम्यान पाटीलची उलटतपासणी घेणे हा आरोपीचा अधिकार होता. परंतु, त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याची उलटतपासणी घेता आली नाही. हे सगळे लक्षात घेता त्याच्या जबाबाला मदत करणारा दुसरा साक्षीदार आणणे गरजेचे होते. ते सरकारी पक्षाने केलेले नाही.

’सलमानच्या मद्यपानाचा पुरावा नाही
‘त्या’ रात्री सलमानने मद्यपान केले की नाही हे आपल्याला माहीत नसल्याची साक्ष ‘रेन बार’चा वेटर मलाय बाग आणि व्यवस्थापक रिझवान राखांगी यांनी दिली होती. ‘रेन बार’मध्ये देयक सलमानने भरले म्हणून त्याने मद्यपान केले असे म्हणता येणार नाही. तसेच अपघातानंतर त्याच्या रक्ताचे नमुने घेतल्यापासून प्रयोगशाळेत तपासेपर्यंतच्या पुराव्यांची साखळी पोलिसांनी सिद्ध केलेली नाही. उलट चाचणीसाठी सलमानचे सहा मिली रक्त दोन बाटल्यांमध्ये समप्रमाणात घेण्यात आले होते. परंतु तपासणीच्या वेळेस एका बाटलीतील रक्त एक मिलीने कमी व दुसऱ्या बाटलीतील रक्त एका मिलीने वाढल्याची साक्ष रक्त तपासणाऱ्या तज्ज्ञाने दिली आहे. त्यामुळे पुराव्यांसोबत छेडछाड झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

’ गाडी चालवल्याचाही पुरावा नाही
जे. डब्लू मॅरिएट हॉटेलचा वाहनतळ साहाय्यक कल्पेश वर्मा याने सलमान गाडी चालवत असल्याचे माहीत नाही असे सांगितले. त्यामुळे तोच गाडी चालवत होता हेही सिद्ध झालेले नाही. तसेच अपघात झाल्यामुळे चालकाच्या दरवाजातून बाहेर पडल्याचा सलमानचा बचाव नाकारता येत नाही. त्यामुळे अपघात झाला तरी तो कुणी केला हे सिद्ध झालेले नाही.

’दुसरा प्रत्यक्षदर्शी म्हणून
कमालची साक्ष आवश्यक होती
अपघाताच्या वेळी सलमानसोबत कमाल खान होता. रवींद्र पाटील याच्या मृत्यूनंतर कमाल खान हा एकमेव प्रत्यक्षदर्शी होता. त्यामुळे सलमान मद्य प्यायला होता का? सलमान गाडी चालवत होता का आणि अपघातस्थळी काय झाले हे सांगणारा दुसरा कोणीही साक्षीदार नव्हता. त्यामुळे त्याला साक्षीसाठी पाचारण करायला हवे होते. मात्र सरकारी पक्षाने त्याला बोलावण्यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत.

’अशोक सिंगची साक्ष डावलली
अपघात सलमानने केला नसून तो आपण केल्याची कबुली देणारा सलमानचा चालक अशोक सिंग याने दिलेल्या साक्षीला सत्र न्यायालयाने गांभीर्याने घेतले नाही. अशोक सिंग १३ वष्रे कोठे होता, असे म्हणणे चुकीचे आहे. सिंगने कायदेशीर प्रक्रियेप्रमाणे योग्यत्या वेळी साक्ष दिली तसेच अपघातानंतर अशोकने वांद्रे पोलीस ठाण्यात अपघाताची कबुली दिली होती, परंतु पोलिसांनी आणि सत्र न्यायालयाने त्यांची साक्ष गांभीर्याने घेतली नाही.

’ गाडीचा टायर अपघातापूर्वी की नंतर फुटला हे अनुत्तरितच
अपघात होण्यापूर्वी टायर फुटला की नंतर या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी पोलिसांनी अपघातानंतर गाडीची न्याय वैद्यक तपासणी करणे गरजेचे होते. परंतु केली गेली नाही. त्यामुळे गाडीचा टायर अपघातापूर्वी की नंतर फुटला हे अनुत्तरितच राहिले आहे.

’ नुरुल्लाचा मृत्यू क्रेनमधील
गाडी पडल्यामुळेच
नुरुल्ला याचा मृत्यू गाडीखाली चिरडून झाला नाही, तर अपघातग्रस्त गाडी क्रेनद्वारे उचलली जाताना पुन्हा जमिनीवर आदळली आणि तो त्याखाली सापडल्याने झाला. त्याच्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचे कारण स्पष्ट झालेले आहे.