मुंबई: मुंबई  महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या दिवाळी बोनस अर्थात  सानुग्रह अनुदानाबाबत आज, सोमवारी निर्णय होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांच्यात बैठक होणार आहे.

कामगार संघटनांनी यंदा ४० हजार रुपये बोनसची मागणी केली आहे. त्यामुळे कामगारांना नक्की किती बोनस मिळणार ते सोमवारी समजू शकेल.  पालिका कर्मचाऱ्यांना गेल्या वर्षी १५ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्यात आले होते. तर यावर्षी पालिकेच्या अर्थसंकल्पात १५३ कोटी १४ लाख रुपयांची तरतूद सानुग्रह अनुदानासाठी करण्यात आली आहे. यातून प्रत्येक कर्मचारी आणि कामगाराला १७ हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान मिळू शकेल, मात्र कामगार संघटनांच्या समन्वय समितीने सुरुवातीला ४० हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान देण्याची मागणी केली होती. काही दिवसांपूर्वी संघटनांची पालिका आयुक्तांबरोबर बैठक झाली असून त्यात २० हजार रुपयांपर्यंत सानुग्रह अनुदान मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. पालिकेच्या कर्मचारी आणि कामगारांनी करोना काळात केलेल्या कामाचा विचार करून यंदा सानुग्रह अनुदान वाढवून देण्याची मागणी संघटनांनी केली आहे. तर दुसरीकडे यावर्षी टाळेबंदीमुळे पालिकेचे उत्पन्न कमी झाले आहे. त्यामुळे  नक्की किती सानुग्रह अनुदान मिळते याकडे सगळ्याच कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.

मुख्यमंत्री आणि पालिका आयुक्तांची  सोमवारीबैठक होणार आहे. त्यात सानुग्रह अनुदानाचा निर्णय होण्याची शक्यता आहे, असे मुंबई महानगरपालिका कामगार कर्मचारी संघटना समन्वय समितीचे निमंत्रक अ‍ॅड. प्रकाश देवदास यांनी सांगितले.