मुंबई : राज्यातील महाविद्यालये सुरू करण्याबाबत २० जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यात येईल, असे राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी शनिवारी सांगितले.
नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्याच्या निर्णयानंतर महाविद्यालये कधी सुरू होणार याबाबत विद्यार्थी आणि प्राध्यापकांकडून विचारणा करण्यात येत आहे. सामंत यांनी शनिवारी समाजमाध्यमावर विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यावेळी महाविद्यालये सुरू करण्याबाबत २० जानेवारीपर्यंत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती त्यांनी दिली. राज्यातील परिस्थितीचा आढावा घेऊन विद्यापीठे, महाविद्यालयांमध्ये ५० टक्के विद्यार्थ्यांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्याबाबत विचार करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्य़ात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे केंद्र सुरू करण्याचा शासनाचा विचार असल्याचे सामंत यांनी सांगितले.
संगीत महाविद्यालयासाठी समिती
मुंबईत पंडित हृदयनाथ मंगेशकर आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्यात येणार असून, त्यासाठी ज्येष्ठ संगीतकार पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या अध्यक्षतेखाली १२ सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार आहे. या महाविद्यालयातील सर्व निर्णय मंगेशकर समिती घेणार असून लवकरच या समितीतील सदस्यांची घोषणा हृदयनाथ मंगेशकर करतील, असे सामंत म्हणाले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 10, 2021 4:28 am