वाढलेल्या टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठानेही सर्व लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षांबाबत ३ मेनंतर निर्णय जाहीर करण्यात येईल असे स्पष्ट केले असून सध्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

परीक्षा पुढे ढकलण्याबरोबरच विद्यापीठाने अर्ज भरण्यासही मुदतवाढ दिली आहे. त्याचे स्वतंत्र वेळापत्रक जाहीर करण्यात येणार आहे. परिस्थितीचा ३ मे रोजी आढावा घेऊन आणि शासनाच्या पुढील आदेशानुसार परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. मानव्यविद्या, विज्ञान आणि तंत्रज्ञान, वाणिज्य आणि व्यवस्थापन, आंतरविद्याशाखा या चार विद्याशाखांच्या ७५९ परीक्षा प्रलंबित आहेत.

‘टाळेबंदी वाढविण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यापीठ अनुदान आयोग, राज्य शासन व विद्यापीठे परीक्षेसंदर्भात गांभीर्यपूर्वक विचार करीत आहे.  यासंदर्भात लवकरच  निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत विद्यार्थ्यांंनी घरात बसून ऑनलाईन माध्यमातून अभ्यास करावा. काही शंका असतील  तर आपल्या शिक्षकांशी संपर्क साधून त्या सोडवाव्यात,’ असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी केले आहे.