अक्षय मांडवकर

वर्सोवा-घोडबंदरदरम्यानच्या पुलाला आठ मार्गिका जोडण्याचा निर्णय

पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’कडून (एमएमआरडीए) वर्सोवा ते घोडबंदर रोड दरम्यान उभारण्यात येणाऱ्या पुलाला उत्तन, मनोरी, डोंगरी, गोराई आणि भाईंदर येथून आठ मार्गिका जोडण्यात येणार आहेत. वर्सोवा-घोडबंदर रोड या पुलाच्या मार्गिका निश्चितीचे काम पूर्ण झाले असून या त्यातील ९० टक्के मार्गिकेला मान्यता निश्चित मानली जात आहे.

वर्सोवा ते विरार या सागरी सेतूची घोषणा नुकतीच झाली. हा पूल ‘एमएसआरडीसी’ बांधणार आहे. या पुलाबरोबरच वर्सोवा ते घोडबंदर रोड दरम्यान ‘एमएमआरडीए’कडून एक पूल उभारण्यात येणार आहे. या पुलाच्या मार्गिका निश्चितीचे काम पूर्ण झाले आहे. विशेष म्हणजे पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आठ ठिकाणांहून या पुलाला जोडणारे पर्यायी मार्ग उभारण्यात येणार आहेत. या आठ मार्गाबाबतही दोन पर्याय तयार करण्यात आले आहेत. मालाड, मार्वे, मनोरी-गोराई, बोरिवली-गोराई, उत्तन-डोंगरी, उत्तन, भाईंदर आणि घोडबंदर या ठिकाणांना पुलाद्वारे एस. व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगर्ती महामार्गाला जोडण्यात येणार आहे. या पुलाच्या मार्गनिश्चितीचे काम पूर्ण झाले असून सध्या तयार झालेल्या प्रस्तावातील ९० टक्के मार्गाला अंतिम परवानगी मिळण्याची शक्यता असल्याची माहिती ‘एमएमआरडीए’च्या अधिकाऱ्याने दिली. तसेच विस्तृत प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर असून, माती परीक्षणाला सुरुवात झाल्याचे त्यांनी सांगितले.

वर्सोव्याहून दोन्ही मार्गिका?

एमएसआरडीसी वांद्रे-वर्सोवा-विरार असा मार्ग बांधणार आहे, तर एमएमआरडीए वसरेवा ते घोडबंदर असा मार्ग उभारणार आहे. हा मार्ग एमएसआरडीसीचा वांद्रे ते वर्सोवा टप्पा जिथे संपतो तेथूनच सुरू होण्याची शक्यता आहे.

मिठागरे-खारफुटीला धोका?

वर्सोवा-घोडबंदर हा पूल मनोरी खाडीमार्गे गोराई- उत्तन- मार्वे- मनोरी- डोंगरी- भाईंदर (पूर्व) याअंतर्गत भागातून जाणार आहे. यामुळे मनोरी खाडीतील खारफुटीला धोका निर्माण झाला असून काही ठिकाणांहून हा पूल मिठागरांमधून जाणार आहे.

वर्सोवा-घोडबंदर रोड या पुलाच्या मार्गिकानिश्चितीचे काम पूर्ण झाले आहे. पश्चिम द्रुतगती महामार्गावर निर्माण होणारी वाहतूक कोंडी कमी करण्याच्या आणि उत्तन, मनोरी, डोंगरी, गोराई या भागांचा विकास करण्याच्या उद्देशाने या पुलाची निर्मिती करण्यात येणार आहे. शिवाय एस. व्ही. रोड आणि पश्चिम द्रुतगती महामार्गाला पुलाद्वारे जोडणाऱ्या मार्गिका तयार करण्यात येणार आहेत.

– संजय खंदारे, अतिरिक्त महानगर आयुक्त, एमएमआरडीए