उच्चांकी इंधनदरवाढीपाठोपाठ आता भाडेवाढीने महागाईत आणखी तेल ओतले आहे. मुंबई महानगरात १ मार्चपासून काळ्या-पिवळ्या रिक्षा-टॅक्सींच्या भाडय़ात किमान तीन रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय मुंबई महानगर प्रदेश परिवहन प्राधिकरणाने सोमवारी घेतला. करोना संकटकाळात रोजगार, उत्पन्न आक्रसले असताना प्रवाशांना भाडेवाढीचा हा भार सोसावा लागणार आहे.

सध्या रिक्षाचे भाडे १८ रुपये असून नवीन भाडेदरामुळे ते २१ रुपये, तर टॅक्सीचे भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये होईल. मुंबई महानगरातील ज्या भागांत मीटर रिक्षा आणि टॅक्सी धावतात (मुंबई, ठाणे, नवी मुंबई, वसई-विरार, कल्याण-डोंबिवलीसह अन्य भागांमध्ये) तेथे ही वाढ लागू असेल. मुंबईत दोन लाखांहून अधिक, तर मुंबई महानगरात सव्वा तीन लाखांपर्यंत रिक्षा आहेत. काळ्या-पिवळ्या टॅक्सींची संख्याही साधारण ४८ हजार आहे.

यापूर्वी हकीम समितीच्या सूत्रानुसार प्रत्येकवर्षी जूनमध्ये रिक्षा-टॅक्सी भाडेवाढ होत होती. त्याबाबत प्रवाशांनी अनेकदा नाराजीही व्यक्त केली होती. त्यानंतर शासनाने हकीम समिती बरखास्त करून एक सदस्यीय खटुआ समिती स्थापन केली. या समितीने ऑक्टोबर २०१७ मध्ये ३०० पानी अहवाल सादर केला होता. त्यानंतर अहवाल स्वीकारण्यास काही कालावधी लागला. आता या समितीच्या काही शिफारशी लागू केल्या आहेत. मात्र भाडेदराशी संबंधित शिफारशी लागू केल्या नव्हत्या.

वाहनांची सरासरी किं मत, विम्याचा हफ्ता, मोटर वाहन कर, व्यवसाय कर, ग्राहक, निर्देशांक, वाहन कर्जाचा व्याजदर इत्यादी बाबी विचारात घेऊन खटुआ समितीच्या शिफारशींनुसार परिगणना करून भाडेवाढीचा प्रस्ताव मुंबई महानगर क्षेत्र परिवहन प्राधिकरणापुढे सादर करण्यात आला होता. तो सोमवारी मंजूर करण्यात आला.

दरवर्षी जून महिन्यात भाडेवाढ

खटुआ समितीच्या शिफारशीनुसार वर्षांतून एकदा जूनच्या पहिल्या तारखेस भाडेदरात सुधारणा करावी. प्रति किलोमीटर मूळ दरात ५० पैसे िंकंवा ५० पैशांपेक्षा जास्त वाढ देय असल्यास भाडे सुधारणा लागू करावी, असाही निर्णय घेण्यात आला.

भाडेवाढीच्या निर्णयाचा निषेध

टाळेबंदीच्या सुरुवातीच्या सहा महिन्यांत चालकांचे उत्पन्न बुडाले. त्यामुळे प्रत्येक महिन्यात प्रत्येक चालकाला किमान दहा हजार रुपये आर्थिक मदत करावी आणि रिक्षांसाठी घेतले कर्ज व्याजासह माफ करावे ही प्रमुख मागणी केली होती. परंतु सरकारने यातून पळवाट काढून आर्थिक मदत देणे टाळले व भाडेवाढ दिली. करोनाकाळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या व वेतनही कमी झाले. अशावेळी भाडेवाढ करुन सरकारने प्रवाशांचीही नाराजी ओढवून घेतली आहे. प्रवासी कमी होण्याची चालकांनाही भीती आहे. शासनाच्या या निर्णयाचा निषेध करत आहोत. आर्थिक मदत व कर्जमाफीसाठी रिक्षा चालकांकडून निवेदन मागवून ते शासनाला सादर करणार आहोत.

-शशांक राव, अध्यक्ष, मुंबई ऑटोरिक्षा टॅक्सीमेन्स युनियन

काळी- पिवळी टॅक्सी दर (सीएनजी)

सध्याचे दर     वाढीव दर      वाढ

किमान भाडे           २२ रु.          २५ रु.            ३ रु

प्रति किमी.            १४.८४ रु.      १६.९३ रु.      २.०९ रु

काळी-पिवळी रिक्षा दर (सीएनजी)

सध्याचे दर     वाढीव दर     वाढ

किमान भाडे          १८ रु.            २१ रु.           ३ रु.

प्रति किमी.            १२.१९ रु      १४.२० रु    २.०१ रु

१ मार्च २०२१ पासून नवीन भाडेदर लागू होणार आहेत. मात्र, रिक्षा व टॅक्सींच्या मीटरमध्ये नवीन भाडेदर बदल करण्यास साधारण तीन महिन्यांचा कालावधी चालकांना परिवहन विभागाकडून देण्यात आला आहे. बदल होईपर्यंत चालक १ मार्चपासून येणाऱ्या नवीन दरपत्रकानुसार प्रवाशांकडून भाडे घेऊ शकतील, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

भाडेवाढ मागे घेण्याची भाजपची मागणी

मुंबई : रिक्षा व टॅक्सीची भाडेवाढ मागे घेण्याची मागणी भाजपने केली असून ते न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा मुंबई भाजप प्रभारी आमदार अतुल भातखळकर यांनी सोमवारी सरकारला दिला. करोनामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या सामान्य मुंबईकरांवर आर्थिक बोजा टाकण्याचे काम ठाकरे सरकारने केले आहे, असे भातखळकर यांनी म्हटले आहे.

दरवाढ अशी..

* रिक्षाचे किमान भाडे १८ रुपये आहे, ते २१ रुपये होईल.

* टॅक्सीचे किमान भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये होईल.

आणखी बदल काय?

* पूर्वीच्या तुलनेत आता पुढील प्रति किमीसाठी रिक्षाकरिता २ रुपये ०१ पैसे आाणि टॅक्सीसाठी २ रुपये ०९ पैसे जास्त मोजावे लागतील.

* शेअर रिक्षा, टॅक्सी आणि प्रीपेड रिक्षांच्याही भाडेदरात बदल होणार आहेत.

* दोन्ही सेवांच्या मध्यरात्रीच्याही भाडेदरात बदल होतील.

रिक्षा-टॅक्सी चालकांना खूप वर्षांपासून भाडेवाढ देय होती. ती आता १ मार्चपासून लागू होईल. नवीन भाडेदरासाठी रिक्षा-टॅक्सींना मीटरमध्ये बदल करावे लागतील. मे २०२१ पर्यंत सर्व चालकांनी हे बदल करणे गरजेचे आहे. १ जूनपासून नवीन मीटरप्रमाणे भाडेदर दिसले पाहिजेत.

अनिल परब, परिवहन मंत्री

शेअर निर्देशांकांत मोठी घसरण

मुंबई : इंधनाची भाववाढ आणि करोना प्रतिबंधासाठीच्या नव्या निर्बंधमात्रेमुळे भांडवली बाजारातील गुंतवणूकदार सोमवारी धास्तावले. सप्ताहारंभीच समभाग विक्रीचे तुलनेने अधिक व्यवहार झाल्याने प्रमुख निर्देशांकात गेल्या दोन महिन्यांत प्रथमच मोठी घसरण झाली. मुंबई शेअर बाजार निर्देशांक सोमवारी थेट १,१४५.४४ अंशांनी घसरला आणि ४९,७४४.३२ वर आला.