News Flash

विद्यार्थी ‘तावडे’तून सुटले ! 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा ‘विनोद’ मागे

शिक्षण विभागाचा निर्णय अखेर मागे

शैक्षणिक साहित्य खरेदी वाटपातील सावळा गोंधळ सातत्याने पुढे येत आहे.

मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरु ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय अखेर मागे घेण्यात आला आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी हा घोषणा केली असून आपण अधिकाऱ्यांना बोलावून सूचना देणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. याआधी मार्चमध्ये परीक्षा झाल्यावरही 30 एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचा शिक्षण विभागाचा निर्णय होता. शिक्षण विभागाच्या या निर्णयावर पालकांसहित शिक्षकांकडूनही टीका होत होती. अखेर हा निर्णय मागे घेण्यात आला आहे.

हा निर्णय केंद्र सरकारच्या आदेशानंतर घेण्यात आला होता अशी माहिती त्यांनी यावेळी दिली असून आवश्यकता भासली तर पुढील शैक्षणिक वर्षात लागू करु, असंही विनोद तावडेंनी सांगितलं आहे.

परीक्षा संपल्या की मामाच्या किंवा बाबांच्या गावाला जाण्यासाठी आतुर झालेले विद्यार्थी आणि बस-रेल्वेमधील तिकिटांचे आरक्षण करून प्रवासाची आखणी अंतिम टप्प्यात आणणाऱ्या पालकांना शिक्षण विभागाने तडाखा दिला होता. दरवर्षी परीक्षा संपली की दुसऱ्या दिवसांपासून उन्हाळी सुट्टी सुरू होते. दहावीची परीक्षा झाली की शाळेच्या परीक्षा आणि त्यानंतर साधारण मार्च अखेर किंवा एप्रिलमध्ये मुलांना सुट्टी असते. त्यानंतर एप्रिल अखेर किंवा १ मे रोजी निकाल आणि मग महिनाभर शिक्षकांनाही सुट्टी असे शाळेचे वार्षिक वेळापत्रक असे. मात्र हे वेळापत्रक बदलण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. पहिली ते नववीच्या राज्यमंडळाच्या शाळा १ मे पर्यंत सुरू ठेवाव्यात असे आदेश विद्या प्राधिकारणाने दिले होते. या कालावधीत मुलांसाठी उपक्रम, उन्हाळी शिबिरे आयोजित करावीत अशाही सूचना देण्यात आल्या होत्या.

मार्चमध्ये मुलांना सुट्टी दिली की शाळांमध्ये निकाल, वार्षिक कागदपत्रांची पूर्तता अशी कामे सुरू होतात. त्याचप्रमाणे दहावीच्या विद्यार्थ्यांच्या तासिका सुरू होतात. आता मुले शाळेत येणार असतील तर हे काम कधी करायचे, असा प्रश्न शिक्षकांकडून विचारण्यात येत होता.

काय होता निर्णय ?
शाळांमधील पहिली ते नववीचे वर्ग १ मेपर्यंत सुरू राहतील. या कालावधीत उन्हाळी शिबीर आणि इतर उपक्रम राबविले जातील. वर्गातील उपस्थिती विद्यार्थ्यांना बंधनकारक असेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2018 11:25 am

Web Title: decision to remain schools opened till 30th april cancelled
Next Stories
1 संभाजी भिडेंच्या समर्थनार्थ सांगली, पुण्यात मोर्चा
2 ‘तरुण तेजांकित’ सोहळ्यास पोहनकर पिता-पुत्राची स्वरसाथ
3 मंत्र्यांविरोधातील चौकशी अहवाल जाहीर करा
Just Now!
X