हाफकिन संस्थेतील नियोजित जागेत वाहनतळ

कर्करोग रुग्णांच्या वाढती संख्या लक्षात घेऊन ‘टाटा मेमेरिअल सेंटर’ला परळच्या हाफकिन संस्थेतील तब्बल पाच एकर जागा बाल व महिला कॅन्सर रुग्णालय आणि हायड्रॉन बीम थेरपीसाठी २०१३ मध्ये पाच कोटी रुपयांमध्ये हस्तांतरित करण्यात आली. तथापि गेल्या चार वर्षांत टाटा मेमोरियलने तेथे रुग्णालयाची एक वीटही उभारलेली नसून सध्या सदर जागेचा वापर वाहनतळ म्हणून करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

‘टाटा मेमोरियल’मध्ये मोठय़ा प्रमाणात येणारे रुग्ण तसेच उपलब्ध जागा लक्षात घेता टाटा मेमोरियलने परळ येथील हाफकिन शिक्षण संस्थेच्या २८ एकर जागेपैकी पाच एकर जागेची मागणी केली. राज्य शासनाने सदर जागा बाल व महिला कॅन्सर रुग्णालयासाठी देताना केलेल्या करारानुसार सदर जागेवर असलेले संस्थेचे वसतिगृह, अतिथीगृह तसेच सेवा निवासस्थान आदी इमारती अन्यत्र हलविण्यासाठी पाच कोटी रुपये देण्याचे निश्चित करण्यात आले.

हाफकिन संस्थेने पाच एकर जागेपैकी एक मंदिर व सेवानिवृत्त कर्मचारी राहात असलेली जागा वगळता उर्वरित सर्व जागा मोकळी करून टाटा मेमेरिअलच्या ताब्यात दिली. तथापि गेल्या चार वर्षांत टाटा मेमोरिअलने यातील एक कोटी रुपये केवळ दिले असून मंदिर व सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा प्रश्न टाटाने सोडवावा, अशी भूमिका वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतली आहे. सदर जागा टाटाने ताब्यात घेतल्यामुळे आता हाफकिनचे उर्वरित चार कोटी रुपये द्यावे अशी मागणी वैद्यकीय शिक्षण विभागाने लावून धरल्यानंतर २०१६ मध्ये टाटा मेमेरिअलने हाफकिनला आणखी दोन कोटी रुपये म्हणजे पाच कोटी रुपयांपैकी तीन कोटी रुपये देऊ केले.

  • टाटाच्या ताब्यात दिलेल्या जागेवर काही भूमिगत पाण्याच्या टाक्या होत्या. त्या अन्यत्र उभारण्यासाठी येणाऱ्या ४५ लाख रुपये खर्चापैकी निम्मी रक्कम टाटा मेमोरिअलने द्यावी, असेही निश्चित करण्यात आले होते.
  • तथापि त्यावरही अद्याप अंतिम निर्णय झाला नसून मंदिर व एका कर्मचाऱ्याच्या जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न कोणी सोडवायचा या वादात गेल्या चार वर्षांत बाल व महिला कॅन्सर रुग्णालयाचे बांधकामच सुरू होऊ शकलेले नाही. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव राजगोपाल देवरा यांना विचारले असता टाटा मेमोरिअलच्या ताब्यात जागा देण्यात आली असून त्यांनीच हा प्रश्न पालिकेच्या मदतीने सोडवून घेतला पाहिजे असे सांगितले.
  • तथापि टाटाचे संचालक डॉ. राजन बडवे यांनी ८ जून २०१६ रोजी हाफकिनच्या संचालकांना पत्र पाठवून मंदिराची जागा तुम्हीच रिकामी करून आमच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली आहे, तर करारानुसार जागा तुमच्या ताब्यात असल्यामुळे महापालिकेच्या माध्यमातून ही जागा तुम्हीच रिकामी करून घ्या, असा पवित्रा वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला आहे. या साऱ्यात गेल्या चार वर्षांत कॅन्सर रुग्णालय तसेच हायड्रॉन बीम थेरपी सेंटरची एक वीटही या जागेवर उभी राहू शकलेली नाही.