राज्यातील सहकारी संस्थांच्या संख्येमध्ये गेल्या दहा वर्षांमध्ये १२ हजाराने घट झाली असली तरी त्यांच्या भांडवलामध्ये मात्र सुमारे दीड लाख कोटी रुपयांहून अधिक वाढ झाली आहे.

राज्यात २०१०-११ मध्ये दोन लाख २४ हजार ३०६ इतक्या संस्था होत्या. त्यांची संख्या घटून दोन लाख १२ हजार ९५१ वर आली आहे. मात्र या संस्थांमधील खेळते भांडवल दोन लाख ४८ हजार ४३४ कोटी रुपयांवरून तीन लाख ९७ हजार ४६६ कोटी रुपयांवर गेले आहे. अनेक संस्था गेल्या काही काळात अडचणीत येऊनही सहकारी संस्थांवर गुंतवणूकदारांचा विश्वास टिकून राहिल्याचे आणि त्यामधील गुंतवणूक वाढत असल्याचे दिसून येत आहे.

बँकाकडून कृषी कर्जपुरवठय़ात साडेसात हजार कोटी वाढ

कृषीक्षेत्राला बँकांकडून होणाऱ्या कर्जपुरवठय़ात वाढ होत असून २०१९-२० मध्ये ६३ हजार ३१ कोटी रुपये कर्जपुरवठा झाला, तर २०२०-२१ मध्ये करोनाकाळातही हे प्रमाण वाढले असून  ७० हजार ५२९ कोटी कर्जपुरवठा करण्यात आला. त्यापैकी वाणिज्यिक बँकांकडून ५२ हजार ८७ कोटी रुपये, ग्रामीण बँकांकडून ३३६९ कोटी रुपये आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेसह जिल्हा बँकांकडून १५ हजार ७३ कोटी  कर्जपुरवठा झाला.  पीककर्जासाठी गेल्या आर्थिक वर्षांत २८ हजार ६०४ कोटी रुपये बँकांनी उपलब्ध करून दिले. तर २०२०-२१ मध्ये पतपुरवठा वाढून तो ४० हजार ५१५ कोटी रुपयांवर गेला आहे.

सहकार क्षेत्र २०१०-११ २०१९-२०

प्राथमिक कृषी पतसंस्था  २१,४५१ २०,७४४

सभासद (लाख)  १५० १४७

सहकारी संस्थांची संख्या  २,२४,३०६   २,१२,९५१

सभासद (लाख)  ५३० ५५६

सहकारी संस्थांचे खेळते

भांडवल (रुपये कोटी )    २,४८,४३४   ३,९७,४६६