• नोटाबंदीनंतर विदेशी मद्याच्या विक्रीत घट
  • तळीरामांना ‘देशी’ची ओढ

नोव्हेंबर महिन्यात झालेल्या निश्चलनीकरणाच्या झळा आता काहीशा कमी झाल्या असल्या तरी, त्याचे परिणाम आता अधिक ठळकपणे येऊ लागले आहेत. विशेष म्हणजे, नोटाबंदीचा मोठा फटका मद्यविक्रीलाही बसल्याचे समोर येत आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात बिअर तसेच विदेशी मद्याच्या विक्रीत लक्षणीय घट झाल्याचे आढळून आले आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मद्याचे प्याले रिचवत नववर्ष स्वागत करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड असले तरी, यंदा डिसेंबरमध्ये दारूविक्रीचा आलेख घसरताच राहिला. हे सर्व सुरू असताना स्वस्त देशी मद्याकडे तळीरामांनी मोर्चा वळवल्याने देशी दारूच्या विक्रीत काही प्रमाणात वाढ झाली आहे.

निश्चलनीकरणानंतर सर्वच उद्योग क्षेत्रांना फटका बसला आहे. चलनतुटवडय़ामुळे एकंदरीत बाजारात मंदीसदृश चित्र निर्माण झाले होते. नोव्हेंबरपासून उद्भवलेल्या या परिस्थितीतून सर्वसामान्य कुटुंबाचे गणित अद्याप रुळांवर आलेले नाही. मात्र, नोटाबंदीच्या निर्णयाने तळीरामांनाही चटका लावल्याची बाब समोर येत आहे. मद्यनिर्मिती आणि विक्री कमी झाल्याने त्यातून सरकारला मिळणारा महसूलही कमी झाला आहे.

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आकडेवारीनुसार नोव्हेंबर महिन्यात विदेशी मद्याच्या विक्रीत आधीच्या वर्षांच्या तुलनेत दीड टक्के तर बिअरच्या विक्रीत १२ टक्क्यांची घट झाली. तर डिसेंबरमध्येही या दोन्ही मद्यप्रकारांच्या विक्रीत अनुक्रमे २.१७ आणि २.५ टक्के घट झाली. विशेष म्हणजे, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पाटर्य़ा, मेजवान्यांना जोर येत असतानाही परदेशी मद्याची विक्री कमी झाल्याचे आढळून आले. असे असतानाच, देशी दारूच्या विक्रीने मात्र काहीशी वरच्या दिशेने झेप घेतली आहे. देशी मद्याच्या विक्रीत यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात १.८ टक्के घट झाली. परंतु, डिसेंबर महिन्यात देशी मद्याच्या विक्रीत १.४३ टक्के वाढच झाली आहे.

liquer-chart

महसुलातही घट

  • यंदाच्या सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात राज्याच्या महसुलात ७ टक्क्य़ांची वाढ नोंदवण्यात आली होती. मात्र, नोव्हेंबरपासून महसुलात घसरण सुरू झाली.
  • गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरमध्ये राज्याला मद्य उत्पादनावर १ हजार २५ कोटींचा महसूल मिळाला होता. त्यात यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात मोठी वाढ उत्पादन शुल्क विभागाला अपेक्षित होती. मात्र, ती केवळ २ कोटींनी वाढून १ हजार २७ कोटींवर गेली आहे.
  • नाताळ, ‘३१ डिसेंबर’मुळे दरवर्षी डिसेंबरमध्ये महसूल वाढलेला असतो. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये १ हजार १३९ कोटींचा महसूल राज्याला मिळाला होता. मात्र, यंदाच्या डिसेंबरमध्ये १ हजार १२१ कोटी इतका कमी झाला आहे.