X

चौसष्ट कलांच्या अधिपतीसाठी कलाकुसर!

प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीमुळे गणपतीची सजावट कशी करावी, हा प्रश्न गणेशभक्तांना पडला होता.

दिशा खातू

गणरायाची आरास स्वत:च करण्याकडे ओढा; सजावटीसाठीचे सामान, कलावस्तूंच्या मागणीत वाढ

चौसष्ट कलांचा अधिपती असलेल्या गणरायाची प्रतिष्ठापना करताना त्याभोवती केली जाणारी आरास ही नेहमीच कौतुकाचा विषय असते. परंतु थर्माकोल, प्लास्टिक यांच्या ‘रेडी टू यूज’ मखरांमुळे गेल्या काही वर्षांपासून गणरायाची आरास ही बाजारातूनच घडवून आणली जात होती. अर्थात यंदा प्लास्टिकबंदीनंतर गणेशभक्तांच्या कलेला नव्याने स्फुरण चढले असून स्वत:च गणेशोत्सवाची सजावट करण्याकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे यंदा कलावस्तूंच्या बाजारातील खरेदीला जोर चढला आहे. एवढेच नव्हे तर हस्तकलाकारांनी तयार केलेल्या छोटय़ा-मोठय़ा सजावटीच्या वस्तूंनाही ग्राहकांची पसंती मिळत आहे.

प्लास्टिक आणि थर्माकोल बंदीमुळे गणपतीची सजावट कशी करावी, हा प्रश्न गणेशभक्तांना पडला होता. या सजावटीला हस्तकलेचा चांगलाच पर्याय उपलब्ध झाला आहे. हस्तकलाकारांना आणि हस्तकलेच्या वस्तूंनाही बाजारात चांगली मागणी आहे. दादर, वांद्रे, अंधेरी, कुलाबा आणि क्रॉफर्ट मार्केट इत्यादी ठिकाणी हस्तकलेच्या विविध वस्तू मुबलक प्रमाणात उपलब्ध झाल्या आहेत. हस्तकलेच्या वस्तूंमध्ये विविध वस्तूंचा समावेश होतो. यात विविध रंगाचे, प्रकारचे कागद येतात. याचा वापर सजावटीच्या वस्तू बनवण्यासाठी, पृष्ठभागावर लावण्यासाठी किंवा कट-आऊ ट बनविण्यासाठी होतो. यात पॅटर्न, टेक्श्चर्ड, मार्बल, रॅग, वॉटर कलर, मेटॅलिक, पोस्टर, तांदूळ (वारली चित्रांसाठी विशेष वापरला जातो) इत्यादी प्रकारचे कागद वापरले जातात. यंदा थर्माकोलला पर्याय म्हणून कार्डबोर्ड आणि पुठ्ठय़ाला सर्वाधिक मागणी असल्याचे घाऊक कागद विक्रेते विराट गुप्ता यांनी सांगितले. एरवी बाजारात न दिसणाऱ्या हस्तकलेच्या वस्तू बाजारात आल्या आहेत. त्यामुळे हस्तकलेच्या वस्तूंच्या विक्रीत प्रथमच मोठी वाढ झाली आहे.

हस्तकलाकार घरच्या घरी सजावट, देखावे उभारतात. तर काही जण गणपतीचे दागिने, मखर, मंडपात लावण्यासाठीच्या शोभेच्या वस्तू बनवतात. यंदा फोमची (जाड स्पंजचा प्रकार) सजावटीच्या कलाकृती बाजारात मोठय़ा प्रमाणात येत आहेत. यापूर्वी फक्त ताज्या फुलांच्या सजावटीसाठी वापरले जाणारे फोम आता वेगळ्या प्रकारात येत आहे. याला कागदी, कापडाची फुले लावून सजविले जाते किंवा विविध प्रकारच्या लेसचा वापर केला जातो. पेहरावाकरिता वापरल्या जाणाऱ्या रिबिनीचाही सजावटीत कलात्मक वापर केला जातो. परंतु खास गणपतीसाठी नवनवीन आकाराच्या आकर्षक पट्टय़ा बाजारात आल्या आहेत.

महात्मा फुले मंडईत (क्रॉफर्ड मार्केट) सजावटीच्या सामानाची विक्री करणाऱ्या अमर मुल्ला यांनी सांगितले की, आजकाल यूटय़ूबवरील ‘डू इट युअरसेल्फ’ (डीआयव्हाय) व्हिडीओ पाहून अनेक जण सजावटीच्या वेगवेगळ्या वस्तू खरेदी करायला येतात. गणपतीच्या काळात तर घरी देखावा करण्यासाठी म्हणून अनेक जण वेगवेगळ्या वस्तू घेऊन जात होते. सुतळ, मणी, मोती, बिल्ले, कागद, लेस या मालाचे ५०००च्याहून अधिक नग विकले गेल्याचे त्यांनी सांगितले.

सर्वाधिक व्यवसाय गणेशोत्सवात

‘वर्षभरात कलाबाजारात जेवढी मागणी नसते तितकी ती गणेशोत्सवात असते. आमच्या वार्षिक उत्पन्नातील जवळपास २७ टक्के हिस्सा गणेशोत्सवातून मिळतो,’ असे उत्पादक मुकेश गोयल यांनी सांगितले. हस्तकला किरकोळ बाजार व्यवस्थापक मनसुखलाल मंगल यांनीही याला दुजोरा दिला. यंदा गणेशोत्सवाच्या काळात हस्तकलेच्या वस्तूंच्या विक्रीत पाच ते दहा टक्क्यांनी वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पाच वर्षांमधील ही खूप मोठी वाढ आहे. प्रत्येक सणासुदीला सजावटीच्या सामानाची विक्री मोठय़ा प्रमाणावर होते. मात्र यंदा मागणी वाढली आहे, असे त्यांनी सांगितले.