मुंबई : गेल्या आठवडय़ात शहर आणि परिसरात किमान तापमानाचा पारा ११ अंश सेल्सिअसपर्यंत उतरला होता. या आठवडय़ात तो २० अंश सेल्सिअसपर्यंत गेला. त्याचवेळी मंगळवारी सायंकाळी मुंबईच्या कमाल तापमानात मात्र चार अंशांची घट झाली.

मुंबईच्या कमाल तापमानात गेल्या चार दिवसांत सातत्याने चढ- उतार नोंदवले जात असून, मंगळवारी त्यामध्ये मोठी घट झाली. १८ जानेवारीपासून कमाल तापमानात वाढ होऊन सोमवारी पारा ३४ अंशावर पोहोचला होता. त्यात घट होऊन मंगळवारी सायंकाळी ३०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविण्यात आले. मात्र तुलनेने किमान तापमानात घट न होता चार दिवसांत वाढच दिसून आली.