मुंबईकरांना थंडीची प्रतिक्षाच करावी लागत असून, दोन दिवसांपासून तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाली आहे. उपनगर आणि महानगर परिसरात काही ठिकाणी पारा २० अंशाच्या खाली गेला. गेल्गेल्या दहा दिवसात राज्यात अनेक ठिकाणी पारा चांगलाच खाली उतरला असला तरी राज्यभरात महाबळेश्वर वगळता कमाल तापमान जवळपास ३० अंश किंवा अधिकच राहीले. गेले काही दिवस मुंबईतील कमाल तापमान ३३ ते ३५ अंश राहीले असून किमान तापमान २४  ते २५ अंशाच्या आसपास होते. मंगळवारपासून किमान तापमानात घट झाली.

हवामान विभागाच्या सांताक्रूझ येथील केंद्रावरील नोंदीनुसार बुधवारी सकाळी २१.४ अंश सेल्सिअस आणि कुलाबा येथे २३ अंश सेल्सिअस असे किमान तापमान नोंदविण्यात आले. उपनगरात बोरीवली, पवई आणि महानगर प्रदेशात पनवेल परिसरात काही ठिकाणी पारा २० अंशाच्या खाली उतरल्याचे हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. कमाल तापमान २८-२९ अंशापर्यंत खाली आले तर हिवाळा सुरु झाला असे म्हणता येईल असे अधिकाऱ्यांनी सांगितले. उत्तर पूर्व वारे वाहायला लागले की अधिक गारवा येईल. अहमदनगरमध्ये १३ अंश सेल्सिअस बुधवारी सकाळपर्यंत राज्यात सर्वात कमी तापमान अहमदनगर येथे १३ अंश सेल्सिअस नोंदवण्यात आले. मराठवाडा आणि विदर्भात सर्वत्र किमान तापमान १५ ते १८ अंश दरम्यान राहीले. तर मध्य महाराष्ट्रात सोलापूर आणि कोल्हापूर वगळता २० अंशापेक्षा कमी नोंद झाली.