मुंबईत गेल्या दोन महिन्यांपासून दररोज करोनाचे हजाराच्या पुढे रुग्ण सापडत असताना मंगळवारी आणखी ८४६ रुग्ण आढळले आहेत, तर दिवसभरात ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. मात्र यापूर्वीच्या ६५ मृत्यूच्या नोंदी समाविष्ट केल्यामुळे मृतांचा आकडा ३,८४२ वर गेला आहे.

महापालिकेने दिलेल्या आकडेवारीनुसार मुंबईतील रुग्णवाढीचा दर कमी होत आहे. सध्या रुग्णवाढीचा दर १.८६ टक्के असून रुग्ण दुपटीचा कालावधी सरासरी ३७ दिवसांवर आला आहे. उत्तर मुंबईतील रुग्णवाढ ३ टक्कय़ांच्या पुढे आहे. वरळी, धारावी, भायखळा अशा एकेकाळी अतिसंक्रमित असलेल्या क्षेत्रांमध्ये रुग्णवाढ कमी होऊ लागली आहे. अनेक दिवसांनंतर  मुंबईत रुग्णांची संख्या कमी झाली आहे.

मुंबईत मंगळवारी ८४६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे एकूण बधितांचा आकडा ६८ हजार ४८१ झाला आहे. मंगळवारी ४५७ रुग्ण बरे होऊन गेले आहेत. आतापर्यंत ३४ हजार ५७६ रुग्ण करोनामुक्त झाले असून ३० हजार ६३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आणखी ८२८ संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले आहे.  मुंबईत आतापर्यंत २ लाख ९४ हजार चाचण्या करण्यात आल्या आहेत. चोवीस तासांत अतिजोखमीच्या ५,७४६ संपर्कातील व्यक्ती शोधण्यात आल्या आहेत.

ठाणे जिल्ह्यात ९२४ नवे रुग्ण

ठाणे : जिल्ह्य़ात करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत असून मंगळवारी जिल्ह्य़ात ९२४ नवे करोना रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्य़ातील करोनाबाधितांचा आकडा २३ हजार ९४२ वर पोहोचला आहे. मंगळवारी जिल्ह्यात तब्बल ४१ रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील एकुण करोनाबळींची संख्या ८१२ वर पोहचली आहे.

ठाणे जिल्ह्य़ात मंगळवारी ९२४ नवे करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये  ठाणे शहरातील १८७, नवी मुंबईतील १११, कल्याण-डोंबिवली  शहरातील २०२, भिवंडी शहरातील १२२, अंबरनाथ शहरातील ५३, उल्हासनगर शहरातील ८३, बदलापूर शहरातील २४, मीरा-भाईंदर शहरातील ९४ आणि ठाणे ग्रामीण मधील ४८ रुग्णांचा समावेश आहे.

मंगळवारी जिल्ह्य़ात तब्बल ४१ जणांचा करोनामुळे मृत्यू झाला असून त्यामध्ये ठाणे शहरातील १०, नवी मुंबईतील ९, भिवंडी शहरातील ९, कल्याणमधील ४, मीरा-भाईंदरमधील ४, अंबरनाथमधील ३ आणि ठाणे ग्रामीणमधील २ रुग्णांचा समावेश आहे.